मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. मोदीसाहेब, महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱया हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा!
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र तसेच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत पक्षीय प्रचारात दंग आहेत व तिकडे मणिपुरात पुन्हा एकदा हिंसेचा आगडोंब उसळला आहे. तेथील जिरीबाम हा जिल्हा सध्या हिंसाचाराचा केंद्रबिंदू बनला आहे. मागील आठवडय़ापासून त्या ठिकाणी हिंसेचा वणवा भडकला आहे. तेथून अपहरण केलेल्या एकाच कुटुंबातील तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह शनिवारी सापडल्यामुळे तेथील वातावरण आणखी तापले आहे. लोकांचा संताप एवढा अनावर झाला की, त्यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासह आरोग्य मंत्री रूपम रंजन यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. शिवाय तीन आमदारांची घरे पेटवून दिली. मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे. तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते, ना केंद्रीय गृहमंत्र्यांना. त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते, परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो व मणिपूर परत परत हिंसेच्या वणव्यात होरपळत राहते. गेल्या आठवडय़ात गुरुवारी हल्लेखोरांनी एका आदिवासी महिलेवर पाशवी
अत्याचार केला
आणि नंतर तिला जिवंत जाळले. तेवढय़ावरच हल्लेखोरांचे समाधान झाले नाही. त्यांनी नंतर 17 घरे पेटवून दिली. जिरीबाम जिह्यात हा भयंकर प्रकार घडला. या घटनेनंतर सोमवारी सुरक्षा दलांनी जिरीबाम परिसरातच मोठी कारवाई केली. तेथे झालेल्या चकमकीत त्यांनी 11 संशयित दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला. सुरक्षा दलांना आलेले हे यश मोठे असले तरी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला केला होता, हे कसे विसरता येईल? आता तर ही चकमक बनावट असल्याचा आरोपच कुकी संघटनांनी केला आहे. त्यामुळे या चकमकीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुन्हा या चकमकीचा बदला म्हणून मणिपूरमध्ये ठिकठिकाणी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. जीवनावश्यक वस्तू, जिन्नस घेऊन जाणारे ट्रक या दहशतवाद्यांनी पेटवून दिले. महिला-मुलांना ओलीस ठेवण्यात येत आहे. शनिवारी अशाच अपहरण केलेल्या तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह सापडले. त्यातून लोकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. परिस्थिती चिघळल्याने मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात
‘आफस्पा’ कायदा
लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सध्या ज्या जिरीबाम जिह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे तेथेही हा कायदा लागू असेल. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठय़ा तोंडाने सांगणाऱया केंद्रीय सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? मणिपूरमधील हिंसाचाराने आतापर्यंत 250 पेक्षा जास्त निरपराध्यांचे बळी घेतले आहेत. 7 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या फक्त दहा दिवसांत तेथे 17 जण मृत्युमुखी पडले आहेत. मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. मोदीसाहेब, महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱया हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा!