Published on
:
20 Nov 2024, 12:09 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:09 am
बंगळूर : भाजपच्या संपर्कात असणार्या आमदारांवर नजर ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे. कोणत्याही कारणास्तव आमिषांना बळी पडून त्यांनी पक्षत्याग करू नये, याची दक्षता घेण्याचे ‘टास्क’ मंत्र्यांना देण्यात आले आहे. सोमवारी मंड्याच्या काँग्रेस आमदारांनी कित्तूर आणि चिक्कमंगळूरच्या आमदारांना भाजपकडून 100 कोटींची आमिषे दाखवण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्हा पालकमंत्री, ज्येष्ठ मंत्र्यांनी संशयास्पद वाटणार्या आमदारांच्या नियमित संपर्कात राहावे. सविस्तर माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवावी. 9 डिसेंबरपासून बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी विरोधी आमदारांकडून सरकारसमोर अडचण निर्माण करण्याचे प्रयत्न होणार, हे नक्की आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वांच्या संपर्कात राहून संघटितपणे विरोधकांना उत्तर देण्याची सूचनाही सिद्धरामय्यांनी दिली आहे.
50 नव्हे, 100 कोटींची ऑफर : आ. गाणिग
काँग्रेस आमदारांना भाजपकडून प्रत्येकी 50 कोटींची नव्हे, तर 100 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मंड्याचे काँग्रेसचे आमदार रवीकुमार गाणिग यांनी केला आहे. ‘ऑपरेशन कमळ’बाबत आरोप-प्रत्यारोप होत असतानाच या गौप्यस्फोटामुळे वादामध्ये आणखी भर पडली आहे. आमदार गाणिग यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस सत्तेवर आल्यापासून भाजपकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी अनेक आमिषे दाखवण्यात येत आहेत. आता तर आमिषांचे प्रमाण वाढतच आहे. याआधी 50 कोटींची आमिषे दाखवण्यात आली होती. आता हा आकडा 100 कोटींवर गेला आहे. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील आणि चिक्कमगळूरचे आमदार एच. डी. तम्मय्या यांना 100 कोटींची आमिषे दाखवली आहेत. मंड्याचे काँग्रेस आमदार गाणिग यांनी भाजपवर कोट्यवधींच्या आमिषांचा आरोप केला तरी आ. बाबासाहेब पाटील आणि आ. एच. डी. तम्मय्या यांनी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.