19 वाघांची शिकार करणाऱ्या अजित राजगोंडला अटक:बहेलिया टोळीच्या म्होरक्याच्या चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात आवळल्या मुसक्या
20 hours ago
2
वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अटक करण्यात आली आहे. बेहेलिया टोळीवर 2013 ते 2015 या कालावधीत विदर्भातील जवळपास 19 वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे. बहेलिया टोळी ही मध्य प्रदेशातील आहे. अजित राजगोंड हा तिचा म्होरक्या आहे. अजितला सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अटक करण्यात आली. बहेलिया टोळीने 2013 ते 2015 मध्ये विदर्भातील जवळपास 19 वाघांची शिकार केल्याचा संशय वनविभाग व पोलिसांनी व्यक्त केली आहे. या शिकारीमागे अजित व त्याचे दोन भाऊन केरू व कुट्टू यांचा हात आहे. त्यामु्ळे अजित राजगोंड याची अटक एक मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. 2015 मध्ये तिरुपतीमध्ये झाली होती अटक उल्लेखनीय बाब म्हणजे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने 2015 मध्ये तिरुपती येथून अजित राजगोंड याला अटक केली होती. त्यानंतर सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास करून अजितला शिक्षाही ठोठावली होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. पण आता त्याच्यासारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्यामुळे वनविभागाची चिंता वाढली आहे. तूर्त, अजित या भागात किती दिवसांपासून वास्तव्यास आहे? त्याने या भागातील वाघांची शिकार केली आहे का? त्याच्या टोळीचे आणखी किती सदस्य या भागात वावरत आहेत? आदी अनेक प्रश्न त्याच्या अटकेमुळे निर्माण झालेत. वन विभागाचे विशेष पथक या प्रकरणी अजित राजगोंडची कसून चौकशी करत आहे. नववर्षात आतापर्यंत 11 वाघांचा मृत्यू झाल्याने चिंता दुसरीकडे, नववर्षाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रातील वाघांच्या मृत्यूदरात मोठी वाढ झाली आहे. गत 22 दिवासंत राज्यात अवैध शिकार, रेल्वे अपघात व नैसर्गिक कारणामुळे तब्बल 11 वाघांचा मृत्यू झाला आहे. ताज्या घटनांमध्ये, 22 जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्रात एका वाघिणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू नोंदवला गेला. तत्पूर्वी, 20 जानेवारी रोजी बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर रक्सौल एक्स्प्रेसच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. या वर्षातील इतर प्रमुख घटनांमध्ये भंडारा जिल्ह्यात विजेच्या तारांमध्ये अडकून एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर यवतमाळमधील उकणी कोळसा खाण परिसरात एका वाघाची शिकार करण्यात आली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या लढाईत एका मादी बछड्याचा बळी गेला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, वाघांच्या मृत्यूची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. विशेषतः रेल्वे मार्ग आणि रस्त्यांवर योग्य अंडरपास किंवा ओव्हरपासची सुविधा नसल्याने वन्यजीवांना धोका निर्माण होत आहे. अवैध शिकारीच्या घटनांमुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 4 पैकी 2 बिबट्यांना H5N1 अर्थात बर्डफ्लूची लागण चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लू ची "सिरो" टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीसेसचा अहवाल प्राप्त झाल्याने ही बाब उघड झाली आहे. नागपूर येथील गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्या पूर्वी मृत पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या 4 गिधाडांचा चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू झाला होता. तर मृत पावलेल्या सर्व गिधाड्यांना याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे आणून पोस्टमार्टम करण्यात आले होते. त्यानंतर याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मधून 3 वाघ 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला शिफ्ट करण्यात आले होते आणि याच 3 वाघांचा डिसेंबर महिन्याच्या 20 ते 23 तारखे दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळेच चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये ठेवलेले 3 वाघ संक्रमित झाले आणि नंतर त्यांचा नागपूरच्या गोरेवाडा मध्ये मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आता व्यक्त केला जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)