चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून बुधवारी सकाळी मतदान केंद्रावर मतदान यंत्र व कर्मचार्यांचा ताफा एसटी आणि खासगी गाड्यांमधून रवाना झाला. pudhari photo
Published on
:
20 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:45 am
चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान होत आहे. मंगळवारी संबंधित मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना करण्यात आल्या. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवडणूक यंत्रणा मार्गस्थ करण्यासाठी मग्न होती. एसटी व खासगी गाड्यांच्या माध्यमातून चिपळूण मतदारसंघातील 336 मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना झाल्या. उद्या या मतदारसंघात 2 लाख 76 हजार 65 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहातून ईव्हीएम मशीन व अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले व देवरुख तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतपेट्या रवाना करण्यात आल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, पोलिस व होमगार्ड असे सहा ते सात जणांचे पथक रवाना झाले. त्यामुळे सकाळपासून युनायटेड स्कूलचा परिसर गर्दीने फुलला होता. निवडणुकीच्या कामावर नेमलेले कर्मचारी विविध जबाबदार्या, अधिकार व कर्तव्ये संबंधित अधिकार्यांकडून जाणून घेत होते. मतपेट्या सुरक्षितपणे रवाना होण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चिपळूण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 76 हजार 65 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 34 हजार 813 पुरुष तर 1 लाख 41 हजार 183 महिला मतदार असून 85 वर्षांवरील 3 हजार 818 तर दिव्यांग 1 हजार 703 मतदार आहेत. यावेळी 5 हजार 17 नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही.168 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग करण्यात येणार आहे.
चिपळूण मतदारसंघामध्ये 336 मतदान केंद्रांवर 336 पोलिस व तेवढेच होमगार्ड असणार आहेत तर प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच कर्मचार्यांच्या 364 टीम बनविण्यात आल्या आहेत. 20 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सर्व मतपेट्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आणण्यात येतील. त्या ठिकाणी 21 टेबल लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मतदान यंत्र जमा केली जातील व रात्री 10 वा. पर्यंत सर्व मतपेट्या दाखल होतील. त्या नंतर त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवून स्ट्राँग रूम सील केला जाईल. मतदान यंत्रणा निर्भय व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून चोख तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लिगाडे यांनी केले आहे.
36 मतदान केंद्रांवर कोणतेही मोबाईल नेटवर्क नाही
या मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही. 168 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. 336 मतदान केंद्रांवर 336 पोलिस व तेवढेच होमगार्ड असणार आहेत तर प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच कर्मचार्यांच्या 364 टीम बनविण्यात आल्या आहेत. 20 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सर्व मतपेट्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आणण्यात येतील.