Published on
:
20 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:30 am
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघात बुधवार, 20 नोव्हेंबरला सकाळी 7 वा. ते सायं. 6 पर्यंत मतदान होणार आहे. यासाठी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या मार्गदर्शनाखाली 279 केंद्रांवर प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी कुडाळ तहसील कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या मंडपातून या सर्व 279 केंद्रांवर मतदान पथके ईव्हीएम व मतदान साहित्य घेऊन रवाना झाली.
संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी व्यक्त करत मतदानावेळी अधिकारी, कर्मचार्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला.
या मतदान प्रक्रियेसाठी 24 जीप व 43 एसटी बसमधून कर्मचारी ईव्हीएम व साहित्यासह आपल्या केंद्रांवर मार्गस्थ झाले. तसेच झोनल अधिकार्यांच्या 45 जीपसुद्धा केंद्रांवर मार्गस्थ झाल्या. या मतदान प्रक्रियेसाठी महसूल विभागासह 1 हजार 232 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघात 279 केंद्रांवर प्रत्येकी 2 पोलिस म्हणजेच 279 केंद्रांवर 558 पोलिस कर्मचारी सज्ज राहणार आहेत. क्र. 1 ते 122 केंद्र मालवण तालुक्यात येत असून, क्र. 123 ते 279 ही केंद्र कुडाळ तालुक्याअंतर्गत येत आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 17 हजार 186 मतदार असून, ते आता मतदान करणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 7 हजार 964, तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 9 हजार 221, तर इतर 1 मतदार आहे.
निवडणूक निर्णय अधिकार्यांनी केले मार्गदर्शन
कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी मतदान केंद्रावर मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व अधिकारी, कर्मचार्यांना आवश्यक सूचना दिल्या. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा झाल्टे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व कर्मचारी एसटी बसने आपापल्या केंद्रांवर जाण्यासाठी रवाना झाले.
पोलिस महानिरीक्षकांची भेट
कुडाळ तहसीलनजीक उभारण्यात आलेल्या मंडपात कर्मचार्यांना निवडणूक साहित्य वाटप सुरू होते. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, मतदान निरीक्षक प्रवीणकुमार धिंद यांनी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वीरसिंग वसावे, वर्षा झाल्टे, शीतल जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते.
5 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार!
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव विजय नाईक (रा. बिजलीनगर कणकवली), महायुतीकडून शिवसेनेचे नीलेश नारायण राणे (रा. वरवडे कणकवली), महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अनंतराज नंदकिशोर पाटकर (रा. हुमरमळा अणाव), बहुजन समाज पार्टीचे रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (रा. कसाल) , रासपच्या उज्ज्वला विजय येळावीकर (रा. उद्यमनगर कुडाळ) असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 17 हजार 186 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 5 हजार नवमतदारांची नोंद झालेली आहे.