30 वर्षांनंतर गोवारींची जखम सुकली,पण शासन स्तरावर उपेक्षा कायम:न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याची मागणी

5 hours ago 1
एरव्ही संपूर्ण विदर्भातून आलेल्या गोवारी समाज बांधवांच्या गर्दीने फुलून जाणारा गोवारी स्मारक परिसर बुधवार, २३ रोजी मात्र दरवर्षी कमी होत जाणाऱ्या उपस्थितीने उदास झाला आहे. नेहमी प्रमाणे स्मारकाकडे येणारी चारही बाजूची वाहतूक कठडे लावून बंद करण्यात येते. गोवारी बांधवांची मतपेढी मजबूत नसावी कदाचित म्हणून राजकीय नेते इकडे फिरकत नाही...मॉरिस कॉलेज टी-पॉइंट येथील शहीद गोवारी स्मारक परिसरात एकेकाळी लाखोच्या संख्येने येणाऱ्या गोवारी बांधवांची उपस्थिती आता कमी होत आहे. मागण्यांच्या बाबतीत शासकीय स्तरावरही उपेक्षा करण्यात येते. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी मोर्चा घेऊन आलेल्या गोवारींवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ११४ निष्पाप गोवारींचा मृत्यू झाला. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नागपूरच्या मॉरिस कॉलेज टी-पॉइंटला साधारण ५० हजार गोवारी सकाळीच धडकले. "आम्ही आदिवासीच आहोत,' असे ठामपणे सांगत, "आम्हाला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवू नका', अशी त्यांची मागणी होती. लोखंडी पुलाकडून टी-पॉइंटकडे येणाऱ्या लहान रस्त्यांवर विधानसभेवर काढलेला हा मोर्चा अडवला होता. त्यावेळी इथला उड्डाण पूल नव्हता. माजी आमदार सुधाकर गजबे, आदिवासींचे नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र गजबे या मंडळींच्या नेतृत्वात गोवारी बाया-माणसं आणि मुलं आपापल्या शिदोऱ्या बांधून नागपुरात संपूर्ण विदर्भातून धडकले होते. शदर पवार मोर्चाच्या भेटीला येत नाहीत, असे समजताच मोर्चात आलेल्या गोवारींमध्ये असंतोष उफाळून आला. सायंकाळी परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, या भीतीपोटी पोलिसांनी मोर्चावरच लाठीहल्ला केला. त्यातून चेंगराचेंगरी झाली आणि ११४ गोवारींचा मृत्यू झाला. मॉरीस कॉलेज टी-पॉईंटला त्यानंतर आजचे गोवारी शाहिद स्मारक उभारण्यात आले. दरवर्षी गोवारी बांधव इथे आपल्या सहवेदना प्रकट करण्यास न चुकता येतात. घटनेत मृत्यू झालेल्या सर्व गोवारींची नावे या स्मारकावर नमुद करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे, हा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवार, १४ ऑगस्ट २०१८ रोजी दिला. त्यामुळे २८ वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या गोवारींच्या संघर्षाला यश मिळाले. पण ते यश पूर्णपणे गोवारींच्या पारड्यात पडलेले नाही. कारण न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी सरकारने अजूनही केलेली नाही. गोंड-गोवारी ही महाराष्ट्रात ना स्वतंत्र जमात अस्तित्वात आहे, ना ती गोंड जमातीची उप-जमातही आहे. गोंड-गोवारी असे संबोधले जाणारे सर्वजण मूळ गोवारीच आहेत. गोंड आणि गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत. आणि गोंडाप्रमाणे गोवारीदेखील आदिवासीच आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article