ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त असताना ठाणे महापालिका प्रशासनाने शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून तयार करण्यात आला असून जवळपास 45 हजार कळवा- खारेगाववासीयांच्या घरांवर वरवंटा फिरवला जाणार आहे. माणसे संपवून केला जाणारा विकास काय कामाचा, असा संतप्त सवाल आज रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी पालिकेने शहराचा विकास आराखडा गुपचूप तयार केला. त्यामुळे घोडबंदर, वर्तकनगर, ठाणे शहर, कळवा, खारेगाव तसेच मुंब्रा येथील हजारो इमारती उद्ध्वस्त होणार आहेत. हे आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करण्यात येणार आहेत. विकास आराखडा कोणाच्या भल्यासाठी तयार करण्यात आला आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
जनआंदोलनाचा इशारा
पालिकेने खारेगावमधून डीपी रोडचा प्रस्ताव टाकला आहे. हा डीपी रोड पुढे नाशिक महामार्गाला जोडला जाणार आहे. डीपी रोडमुळे खारेगावची मूळ संस्कृती नष्ट होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खारेगावातील 17 रहिवासी इमारती, ग्रामपंचायतपासूनची 18 जुनी घरे तसेच खारेगावची ग्रामदेवता, जरीमरीचे प्राचीन मंदिरही तोडले जाणार आहे. येत्या काही दिवसांत ठाण्यात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
कावेरी सेतूचा एफएसआय वापरता येतो का?
कळवा आणि खारेगाव भागातील मंदिरे, मैदाने, इमारती, उच्चभ्रू सोसायटीबाधित होणार आहेत. विकास आराखडा तयार करताना ज्या काही करामती केल्या आहेत त्याचाही पर्दाफाश आपण करणार असून कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे. त्याचा एफएसआय वापरता येतो का, तो एफएसआय कोणी कसा वापरला, यात कोणाचे चांगभले झाले हे लवकरच उघड करण्यात येईल, असा इशारा आव्हाड यांनी दिला.
प्रति चौरसफुटामागे 300 रुपयांचा भाव
विकास आराखड्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र कळवा, मुंब्रा या भागातील विकास आराखड्यातील रस्त्यांवरच अतिक्रमणे उभी राहत आहेत. येथील पालिका अधिकारी प्रति चौरसफुटामागे 300 रुपये घेऊन आपले खिसे भरत आहेत. परंतु कारवाई करण्यासाठी पालिका पुढे येत नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.