करच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू; दारूच्या नशेत चालवत होता वाहनFile Photo
Published on
:
19 Nov 2024, 7:56 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:56 am
अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वाहनाने चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे एमएसईबी ऑफिससमोर घडला.
अमोद कांबळे (27, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मूर्तजा अमीरभाई बोहरा (32, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी मुलाचे वय 17 वर्षे 10 महिने आहे. आरोपी मुलगा मुळचा आसामचा असून तो दिघीतील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान असून आसाम सीमारेषेवर कार्यरत आहेत.
अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या कारमधून भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. त्याने दारू प्राशन केली होती. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही कारमध्ये होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता.
अल्पवयीन मुलगा दारू पिऊन भरधाव वाहन चालवित होता. दरम्यान, पुणे- नाशिक महामार्गावर भोसरीतील महावितरणच्या कार्यालयासमोर मुलाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामूळे कार रस्ता दुभाजकावर चढली आणि विरूद्ध बाजूला गेली.
याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणार्या रिक्षा आणि दोन दुचाकींना भरधाव कारने ठोकरले. या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. आरोपी अल्पवयीन मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. फौजदार पंकज महाजन तपास करीत आहेत.
पोर्शे अपघाताची आठवण
लष्कराच्या दिघीतील तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या आरोपीने मद्य प्राशन करून कार चालवली. ज्यामुळे अपघात होऊन एकाला आपला जीव गमवावा लागला. काही महिन्यांपूर्वी पुण्यात कल्याणीनगर येथे बिल्डरच्या अल्पवयीन पुत्राने पोर्शे या अलिशान कारखाली दोघांना चिरडून ठार मारले होते. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. दिघीतील या अपघातामुळे पोर्शे कार अपघात पुन्हा चर्चेत आले.