अदानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेत मोठा दणका बसला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात आपले विशाल साम्राज्य निर्माण करणाऱ्या अदानींवर फसवणूक आणि लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोर्टाने अदानींना अटक वॉरंट बजावले आहे. अदानींनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे आणि सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि एज्योर पॉवरशी संबंधित हे प्रकरण नेमके काय आहे? ते जाणून घेऊया…
गौतम अदानींवर आरोप काय?
गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी 265 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2236 कोटी रुपये) लाच दिल्याचा तसेच अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून ही बाब लपविल्याचा आरोप आहे. कंपनीतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना ही रक्कम देण्याचे मान्य केल्याचा दावा अमेरिकन वकिलांनी केला आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, अदानी ग्रीन एनर्जीने दिशाभूल करत 2021 मध्ये बॉण्ड सादर करत अमेरिकेसह अन्य आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अमेरिकन बँकांकडून पैसा गोळा केला. आणि अब्जावधी डॉलर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी हिंदुस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची मोठी योजना आखण्यात आली होती, असे अमेरिकन ॲटर्नी ब्रायन पीस यांनी म्हटले आहे. या संदर्भात गौतम अदानी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची वैयक्तिक भेट घेतल्याचेही सांगण्यात आले आहे.
2020-24 मध्येही केले गैरव्यवहार
अदानी ग्रीन आणि एज्योर पॉवर ग्लोबलला सौर प्रकल्प मिळवून देण्यासाठी 2020 ते 2024 दरम्यान हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली होती, असा दावाही करण्यात आला आहे. या कराराद्वारे 20 वर्षांत दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याचा अंदाज होता आणि त्याचा फायदा घेण्यासाठी खोटे दावे करून कर्जे आणि बाँड उभारले गेले. अब्जावधी डॉलर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी हिंदुस्थानी सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची गुप्त योजना आखण्यात आली होती आणि त्याबद्दल सर्वांना अंधारात ठेवण्यात आले होते, असे ब्रायन पीस यांनी पुढे नमूद केले.
कोणाची चौकशी सुरू?
गौतम अदानी यांच्या व्यतिरिक्त अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) बुधवारी त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत जैन तसेच एज्योर पॉवरचे सीईओ रणजीत गुप्ता आणि कंपनी सल्लागार रुपेश अग्रवाल यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप केले आहेत. अदानींनी आपल्या अक्षय ऊर्जा कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी आणि हिंदुस्थानातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी हिंदुस्थानमधील सरकारी अधिकाऱ्यांना अंदाजे 265 दशलक्ष डॉलरची लाच देण्याचे मान्य केले होते, असा दावा करण्यात आला आहे.
अदानी समूहाने स्वत:च्या फायद्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला का? आणि ऊर्जा करार मिळवण्यासाठी हिंदुस्थानी सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची देयके दिली का? याचा तपास अमेरिकेचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणी अमेरिकेतील कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
लाच देण्यासाठी कोड नेमचा वापर!
यूएस वकिलांच्या म्हणण्यानुसार, गौतम अदानी यांच्या कंपनीने सरकारी मालकीच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) ला 12 गिगावॅट सौर ऊर्जा पुरवण्यासाठी कंत्राट मिळवले. तथापि, SECI ला सौरऊर्जा खरेदी करण्यासाठी हिंदुस्थानात खरेदीदार मिळत नव्हते आणि खरेदीदारांशिवाय करार पुढे जाऊ शकत नव्हता. यामुळे अदानी ग्रीन एनर्जी आणि एज्योर पॉवरने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची योजना आखली. अहवालानुसार, त्यातील मोठा हिस्सा आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. यासाठी कोड नेम वापरण्यात आल्याचेही अमेरिकेच्या वकिलांनी सांगितले.