Published on
:
23 Nov 2024, 4:30 am
Updated on
:
23 Nov 2024, 4:30 am
कारखानदारांना किंवा विविध उत्पादक संस्थांना आपल्या उत्पादनाकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. त्यासाठी जगभरच्या जाहिरात एजन्सी प्रसिद्धी कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करत असतात. जाहिरात किती दिवस तसेच कोणत्या वेळी केली जावी, त्यासाठी किती वेळ व किती जागा उपलब्ध आहे, त्यासाठी किती पैसे खर्च होऊ शकतात यानुसार एजन्सीकडून वृत्तपत्र, मासिकं, प्रकाशनं, समाजमाध्यमं आणि टेलिव्हिजन, रेडिओ कंपन्या या माध्यमातून जाहिरातींची प्रसिद्धी आणि प्रक्षेपण केलं जात असतं.
अंमलबजावणी आणि निर्मिती असे दोन विभाग प्रामुख्याने जाहिरात व्यवसायात असतात. तिथे आवड, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या आधारे काम करण्याची संधी मिळू शकते. ग्राहकाला योग्य सेवा देणं, माध्यमांच्या संदर्भात आखणी करणं आणि बाजार संशोधन या प्रमुख कामांचा अंमलबजावणी विभागात समावेश होतो. निर्मिती विभागात जाहिरातीचा मजकूर लिहिणारे कॉपीरायटर्स, द़ृश्यविषयक विचार करणारे व्हीज्युअलायझर्स, स्क्रिप्ट लिहिणारे स्टोरी बोर्ड कलाकार, मुद्रण नियोजक आणि फिल्म निर्मिती अशा प्रकारची काम करणार्यांना जाहिरात व्यवसायात नोकरी मिळू शकते.
कल्पकता, चांगली निरीक्षणशक्ती, गटामध्ये काम करता येण्याचं कौशल्य, संयम, कलात्मकता, बाजारपेठ आणि माध्यम या दोन्ही क्षेत्राबाबत विश्लेषण करण्याची व तर्कसुसंगत विचार करण्याची क्षमता, भाषेची चांगली जाण असे गुण आणि कौशल्य असतील तर या क्षेत्रात प्रवेश करता येणं आणि टिकून राहता येणं अधिक शक्य होऊ शकतं.
भारतात जाहिरातीला ग्राहकांकडून जितका प्रतिसाद मिळतो तितका जगात कदाचित इतरत्र कुठेही मिळत नाही, असं म्हटलं जातं. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये तर जाहिरातीच्या संदर्भात फार मोठी जागरूकता तयार झाली आहे; एवढंच नाही तर जाहिरातीच्या संदर्भातलं मार्केटही दिवसागणीक वाढत, विस्तारत आहे. मास कम्युनिकेशन, अॅडव्हर्टाइजिंग, फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट, इंडस्ट्रियल डिझाइनिंग, व्हिज्युअल कम्युनिकेशन, ग्राफिक्स त्यासोबतच एमबीए केलेल्यांनाही या क्षेत्रात संधी मिळू शकते. अर्थात, स्पर्धेत उतरण्याची आणि टिकून राहण्याची शारीरिक, मानसिक तयारी करून या क्षेत्रात पाऊल टाकणं चांगलं!