संगमनेर मतदार संघात डॉ. सुजय विखे पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छ्ूक होते. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने या ठिकाणी विखे पाटील यांनी आपला भाजपाचे पदाधिकारी असलेल्या अमोत खताळ यांना शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवार मिळवून दिली. वरवर एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची झाली. सकाळपासून मतमोजणीत थोरातांसाठी धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. आता मतमोजणी अखेरच्या टप्यात आहे. 21 पैकी 19 फेर्या पूर्ण झाल्या असून, यामध्ये बाळासाहेब थोरात यांना 90,947 तर विरोधी उमेदवार अमोल खताळ यांना 1, 04,784 मते पडली आहेत. त्यामुळे 13 हजार 837 मतांचे खताळ यांनी लीड घेतल्याचे दिसले. पहिल्या फेरीपासूनच खताळ यांनी मताधिक्य घेतले. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांना उमेदवारी देवून ताकद दिली होती. विखेंच्या पराभवासाठी सभाही घेतल्या होत्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संगमनेरात खताळ यांच्यामागे ताकद उभी केली होती. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही संगमनेरात सभा घेवून थोरातांच्या पराभवासाठी चक्रव्यूह तयार केले होते.
दरम्यान, गणेश कारखाना निवडणुकीपासून थोरातांनी विखेंविरोधात उघड संघर्ष सुरू केला होता. लोकसभा निवडणुकीत नवख्या नीलेश लंके यांना ताकद देवून डॉ. सुजय विखेंचा थोरातांनीच पराभव घडवून आणला होता. मात्र आता संमगमनेरात अमोल खताळ याही नवख्या तरुणाकडून थोरातांचा पराभव घडवून आणत डॉ. सुजय विखेंनी आपल्या पराभवाचा बदला घेतल्याची चर्चा आहे.