अकोला (Akola) :- मध्य रेल्वेच्या भुसावळ – बडनेरा अमरावती विभागात पूर्वी भुसावळ -अमरावती (Amrawati) पॅसेजर धावत होती. या रेल्वेचे नरखेडपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आणि १ फेब्रुवारी २०२० रोजी ती मेमू ट्रेन म्हणून कार्यान्वित झाली कोरोनानंतर सद्यस्थितीत ही मेमू केवळ बडनेरापर्यंत धावत आहे.
लहान स्थानकांवरील प्रवाशांसाठी सोयीस्कर
अकोला मार्गावर सुरूझालेली ही पहिली मेमू रेल्वे आहे. सदर मेमू रेल्वे भुसावळ -बडनेरा विभागातील प्रवाशांसाठी स्वस्त, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा पुरवणारी सेवा म्हणून लोकप्रिय ठरली आहे. विशेषतः लहान स्थानकांवरील प्रवाशांसाठी ही रेल्वे ये-जा करण्यासाठी उत्तम पर्याय ठरली आहे आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. नियमित, वेळेवर आणि परवडणारी सेवा पुरवणारी ही रेल्वे भुसावळ विभागाच्या उत्कृष्ट वाहतूक व्यवस्थेचे प्रतीक मानली जाते. दरम्यान, १ फेब्रुवारी २०२० रोजी भुसावळ नरखेड मेमू गाडीचे अकोला स्टेशनवर उत्साहात स्वागत करण्यात आले होते.
त्यावेळी स्टेशन प्रबंधक (Station Manager) ए. एस. नांदुरकर, उप स्टेशन प्रबंधक आर. एस. उंबरकर, कार्यालय अधीक्षक अब्दुल मुश्ताक, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रशांत डोंगरे, यासीम सोहेल खान, राजेश यादव, सदानंद क्षीरसागर, मोहन मारोती आदी उपस्थित होते.