Published on
:
19 Nov 2024, 6:31 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:31 am
नाशिक : महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत गुड गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट हे दोनच मुद्दे प्रमुख आहेत. विरोधी महाआघाडीच्या भ्रष्टाचारी व दिलेले वायदे पूर्ण न करण्याच्या धोरणांमुळे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी यांच्या महायुतीला मजबूत बहुमत मिळून लोककल्याणकारी सरकार सत्तेवर येईल, असा दावा केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक दौर्यावर आलेल्या मेघवाल यांनी भाजपच्या मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गुड गव्हर्नन्सच्या जोरावर भाजपने हरियाणातील सत्ता हस्तगत केली. काँग्रेस व अन्य पक्ष भ्रम पसरवित असून, जे करता येत नाही ते करण्याची खोटी गॅरंटी देतात. त्यांचे आश्वासन पूर्ण न झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होतात. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारपुढे विविध समस्या असून, कर्मचार्यांचे पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे आल्यापासून खोटे वादे करीत आहेत. मी बिकानेर संसदीय क्षेत्रातील खासदार आहे. तेथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शेतकर्यांचे कर्ज माफ झाल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात क्रेडिट कार्डची समस्या निर्माण झाल्याने बँकांनी कर्ज माफ केले नसल्याचेही ते म्हणाले.