औंढा नागनाथ/हिंगोली (Aundha Nagnath) : विधानसभा निवडणुकीची आचार संहिता संपली तरी औंढा नागनाथ तालुक्यातील विविध विभागात नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत, याविषयी नवनियुक्त आमदारांकडून निरंतर येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आमदार राजू नवघरे यांनी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामचुकार करणाऱ्यांची झाडाझडती केली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी बालाजी गोरे, वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गजानन चव्हाण, बांधकामचे कलटेवाड, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, कृषी विभागाचे गोविंद काळे यांच्यासह इतर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
गत दोन महिन्यांपासून आचारसंहितेचे कारण पुढे करून औंढा नागनाथ तालुक्यातील तहसील व पंचायत समिती कार्यालयाशी निगडित असलेली नागरिकांच्या वैयक्तिक लाभांच्या कामांना अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार राजू नवघरे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार नवघरे यांनी शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून कामात चुकारपणा करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.
यावेळी सर्वाधिक तक्रारी पंचायत समिती कार्यालयाशी संबंधित असतांना गट विकास अधिकारी वैद्यकीय रजेवर होते याबद्दल आमदार नवघरेंनी तीव्र नाराजी व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी विकास माने यांना संबंधितांना नोटीस पाठविण्याची सूचना केली. यावेळी घरकुल, गायगोठा व इतर लाभाच्या कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी उपस्थित सरपंच व ग्रामस्थांनी केल्या याबाबत गंभीर दखल घेत असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगून याविषयी कार्यवृत्तांत तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या व याबाबत अधिवेशनात विषय घेणार असल्याचे आमदार नवघरे यांनी सांगितले.
तत्पूर्वी आमदार राजू नवघरे सलग दुसऱ्यांदा वसमत विधानसभेतून निवडून आल्यामुळे येथील विश्रामगृह परिसरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय दराडे, जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर भाजपाचे मिलिंद यंबल अंकुश आहेर, राजू मुसळे, राजेंद्र सांगळे, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण टोंपे, बबनराव राखोंडे, लाखुसिग राठोड आदींची उपस्थिती होती.