Published on
:
23 Nov 2024, 11:31 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:31 am
येवला : महायुतीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी गेल्या पाच सहा महिन्यात अतिशय चांगले निर्णय घेतले. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातील या निवडणुकीत दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये जातिवादाला थारा नाही, हे निकालातून सिध्द झाले आहे. संपूर्ण निवडणूक आमच्या लाडक्या बहिणींनी जिंकली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मला नेहमी 55 ते 56 हजार मताधिक्य मिळत आले. परंतु ते यंदा ते 27 ते 28 हजारावर आले. त्याची कारणेही तसेच आहे. आमचे मित्र जातीवादाचा प्रचार करत. महाराष्ट्रात कोठे गेले नाही. फक्त येवल्यामध्ये रात्री दोन-दोन वाजेपर्यंत होते. परंतु या महाराष्ट्राने आता सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रामध्ये जातिवादाला थारा नाही, काही लोक त्यांना बोलून आमच्या गोटातून कमी झाले. परंतु मतदारांनी आमची इभ्रत राखली. यामध्ये मागासवर्गीय समाज, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाज हे सर्व आमच्या मागे एकजुटीने उभे राहिले, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आमच्या या लढाईचे नेतृत्व करणे कठीण होते. परंतु आमचे अंबादास बनकर, साहेबराव मढवई, वसंतराव पवार यासारख्या मराठा समाजातील अनेक नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोडेफार यश मिळाले. अधिक यश मिळू शकले नाही. त्यांचे स्वकियांबरोबरसुद्धा काहीसे मतभेद झाले. परंतु ते मागे हटले नाहीत, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.
येवला- लासलगाव मतदारसघात प्रचंड विकासाची कामे झाले. स्वतःला असे वाटत होते की, गेल्या चाळीस वर्षात पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते, विकासासाठी त्रासलेले होते ते जातीवादाला कोणताही थारा न देता 100 टक्के माझ्या मागे उभे राहतील. परंतु दुर्दैवाने ते फारसे काही घडले नाही, याची खंत वाटते, अशी महत्वपुर्ण टिप्पणी त्यांनी केली.
सुपडा साफवर बोलताना भुजबळ म्हणाले की, माझ्या लासलगाव- पाटोदा येथे सभेच्या वेळेस मुद्दामून यायचे. घोषणा द्यायचे. फटाके वाजवायचे. परंतु एकही जण सभेतून हटला नाही, आता येथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होतील? असा सवाल यांनी केला.
येवल्याच्या निमित्ताने एक सिद्ध झाले की कोणी कितीही जातीवादाचे विष पेरण्यासाठी आला तरी हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हे सहन करीत नाही आणि या जातीवादाला फेकून देतात हे या महाराष्ट्राने दाखवून देत महाराष्ट्राने आपली पुरोगामित्व सिद्ध केले आहे.
ज्या फडणवीसांवर आमचे एक मित्र सतत आग ओकत होते, भाजपला गाडून टाका, पाडून टाका असे म्हणत त्या फडणवीसांविरुद्ध सतत सतत शिव्या घालत होते. परंतु आपण आज पाहत आहे की, फडवणीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेतृत्वाखाली विशेषत: भाजपला महाराष्ट्रात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. त्यापेक्षाही जास्त जागा भाजपला मिळाल्या, हे आमच्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतायेत त्यांनी लक्षात घ्यावे. असा विरोध महाराष्ट्रातील जनता चालू देत नाही, अशी टिप्पणी केली.