वसमत येथाल बोगस पीक कापणी प्रयोगाची चौकशीही गुलदस्त्यात
कृषी अधिकारी व तक्रारदारातच झाली बाचाबाची
वसमत/हिंगोली (Crop Insurance) : प्रधानमंत्री पिकविमा योजने संदर्भात असलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसमत तहसील कार्यालयात तालुकास्तरीय तक्रार व संनियंत्रण समितीची बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत तक्रारीचे निवारण तर झाले नाहीत. उलट अधिकारी व तक्रारदारातच तक्रारी वाढल्या उडीद व मुगाचे पीककापणी प्रयोग बोगस झाल्याची तक्रार आहे. मात्र या तक्रारीची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात आहे. बैठकीत शेतकर्यांच्या प्रश्नाला यथोचित उत्तरे मिळाली नसल्याच्याही तक्रारी आहेत. कृषी विभागाचे अधिकारी व तक्रारदार बैठकीतच बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.
खरीप हंगाम २०२४ संदर्भात पीकविमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या शेतकर्यांच्या तक्रारीच्या निपटारा करण्यासाठी व तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार व नियंत्रण समितीची आढावा बैठक २८ नोव्हेंबर रोजी वसमत तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार शारदा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, (Crop Insurance) पिक विमा कंपनीचे अधिकारी यांच्यासह तक्रारदार शेतकरी ,शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत शेतकर्यांनी वसमत तालुक्यात मूग व उडदाचे पीककापणी प्रयोग बोगस झाले आहेत. या संदर्भात तक्रार केल्या आहेत. त्या तक्रारीचे व चौकशीचे काय झाले त्याचा अहवाल सादर करावा अशी मागणी केली. त्यावरून अधिकारी व तक्रारदारातच खटके उडाले असल्याचे वृत्त आहे. निष्पक्षपणे चौकशी करावी अशी मागणी तक्रारदारांची आहे. मात्र मूग व उडदाचे पीक कापणी प्रयोगच झाले नाहीत. घरबसल्या कागदोपत्री प्रयोग दाखवून प्रयोगाचे बोगस अहवाल सादर झाले. त्यामुळे वसमत तालुका पिकविम्या पासून वंचित राहिला. शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असल्याची तक्रार आहे.
या गंभीर तक्रारी संदर्भात वसमत येथे शेतकर्यांनी आंदोलन उभे केले होते. आंदोलनावरून चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र त्या चौकशी समितीचा अहवालही गुलदस्त्यातच आहे. कृषी अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी यावेळी उपस्थित शेतकरी व शेतकर्यांच्या प्रतिनिधींनी केल्या. शेतकर्यांच्या तक्रारी पाहता तहसीलदारांनी तक्रारीचे पुरावे सादर करा पुरावे असतील तर दाखवा असे सांगितले. त्यावरून उपस्थित शेतकर्यांनी अनेक पुरावे बैठकीत मांडले. त्यात बोगस पीक कापणी प्रयोग कसे झाले यामुळे किती नुकसान झाले हे सांगण्यात आले.
मात्र शेतकर्यांच्या वाढलेल्या तक्रारी व पुरावे यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्यांना प्रश्नाचे उत्तरे देता आली नाहीत. त्यावरून कृषीअधिकारी व तक्रारदारातच बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. वसमत येथे कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकार्यांच्या निष्काळजी व मनमानी कारभारामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. मूग व उडीद या पिकांचे पीककापणी प्रयोगच झाले नाही. बोगस प्रयोग दाखवले व जास्त उतारा दाखवण्यात आला. त्यामुळे मूग व उडदाला विमा मिळू शकला नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयाचे नुकसान एकट्या वसमत तालुक्यात झाल्याची तक्रार आहे.
पंतप्रधान पिक विमा (Crop Insurance) योजनेसंदर्भातील तक्रारीचा निफ्टारा करण्यासाठी बोलण्यात आलेल्या तक्रार निवारण बैठकीतच तक्रारी वाढल्या आलेल्या तक्रारीचा निपटारा झाला नाही. त्यामुळे ही बैठक नेमकी कशासाठी घेतली हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. बोगस पीक कापणी प्रयोग करण्याचा धंदा किती वर्षापासून सुरू आहे .त्यातून शेतकर्याचे किती नुकसान झाले याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे मात्र शेतकर्यांनी पुराव्यानिशी तक्रार करून ही तक्रारीची दखल घेतल्या जात नाही उलट प्रकरण दडपण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे.
वसमत तालुक्यात बोगस पीक कापणी प्रयोग झाल्याचा जो आरोप केला होता. त्या आरोपाने प्रचंड खळबळ उडाली आहे. हे या प्रकरणाची दखल घेऊन याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे मात्र तसे होताना दिसत नाही तक्रार निवारण बैठकीत दाखल झालेले पुरावे व तक्रारी या संदर्भात आता आगामी काळात काय निर्णय घेतला जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तथा शेतकरी प्रतिनिधी सतीश पाटील महागावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार निवारण बैठकीत तक्रारीचे निवारण झाले नाही उलट तालका कृषी अधिकार्यांनी वाद उपस्थिती केला. बोगस पीक कापणी प्रयोगा संदर्भातील चौकशी निष्पक्षपणे होत नाही मूग व उडदाचे बोगस पीक कापणी प्रयोग झाले. त्यामुळे पीक विमा शेतकर्यांना मिळाला नाही.
कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले त्याची चौकशी करावी अशी मागणी आहे या संदर्भातील आंदोलनानंतर चौकशी समिती स्थापन झाली त्याचाही अहवाल सादर होत नाही. बैठकीनंतर कृषी अधिकारी आमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार निवारण करण्यासाठी बोलावून तक्रारदाराचीच तक्रार करण्याचा हा प्रकार आहे पिकविमा चा आत्मा असलेल्या पीक कापणी प्रयोगात झालेल्या हेराफेरी संदर्भात आम्ही व्यापक आंदोलन करून हे प्रकरण तडीस देणार असल्याचे सतीश पाटील महागावकर यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
वसमत येथे पार पडलेल्या तक्रार निवारण बैठकीत तक्रारदार व कृषी अधिकारी यांच्यात बोगस पीक कापणी प्रयोगावरून बाचाबाची झाली. प्रकरण तापले बैठकीनंतर कृषी अधिकारी चक्क वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचेही असल्याचे समोर आले आहे. कृषीअधिकारी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले मात्र तेथे तक्रार देण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी विभागाचे अधिकारी पोलीस ठाण्यात आले होते. मात्र त्यांनी कोणतीही तक्रार दिली नसल्याचे सांगितले.