रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या दापोली येथील गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या एका पिग्मी एजंटची भरणा करण्यासाठी पतसंस्थेत आणलेली 49 हजार 50 रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने पतसंस्थेमधून चोरून नेली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गोपाळकृष्ण पतसंस्थेचे पिग्मी एजंट संदेश रवींद्र गांधी हे व्यापाऱ्यांकडून गोळा केलेली दैनंदिन पिग्मीची रक्कम 49 हजार 50 रुपये घेऊन पतसंस्थेत गेले होते. पैशांची पिशवी त्यांनी तेथील टेबलवर ठेवली व ते काउंटरवर स्लीप भरण्यासाठी गेली. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांची पैसे भरलेली पिशवी लंपास केली. पैशांची पिशवी टेबलवर नसल्याचे गांधी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पतसंस्थेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती पैशांची पिशवी घेवून जात असताना आढळून आले.
ती व्यक्ती पतसंस्थेतून बाहेर पडून कोंबडीगल्लीच्या दिशेने निघून जात असल्याचे पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. या प्रकरणी संदेश गांधी यांनी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.