Published on
:
21 Nov 2024, 10:51 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:51 am
धुळे : धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या पाचही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 59.75 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. दरम्यान, या आकडेवारीमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीसाठी 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक 18 उमेदवार साक्री, तर सर्वात कमी सहा उमेदवार शिरपूर विधानसभा मतदारसंघात आहेत. सकाळच्या सत्रात धुळे जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर मतदारांत प्रचंड उत्साह दिसून आला. मात्र दुपारी धुळे शहरातील मतदान केंद्रांवर गर्दी कमी झाली. चाळीसगाव रोड परिसरातील अल्पसंख्याक भागातील मतदान केंद्रांवरील रांगा सायंकाळी 5 नंतर वाढल्या. मतदानादरम्यान साक्री रोड परिसरात दोघा तरुणांना बहुजन वंचित आघाडी उमेदवाराच्या समर्थकांनी पैसे वाटपाच्या संशयावरून चोप दिला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हलवले. दरम्यान मोचीवाडा भागातील मतदान केंद्राबाहेर बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली.
मतदारसंघनिहाय सायंकाळी 5 पर्यंतची टक्केवारी
साक्री-61.61, धुळे ग्रामीण-63.01, धुळे शहर-51.64, शिंदखेडा-60.45, शिरपूर 61.74 टक्के याप्रमाणे जिल्ह्यात सरासरी 59.75 टक्के मतदान झाले आहे.
स्पेअर मतदान यंत्रावरून गोटे यांची तक्रार
धुळे शहर मतदारसंघातील सेक्टर 10 भागात सात अतिरिक्त मतदान यंत्रे आढळून आल्याने महाविकास आघाडी उमेदवार अनिल गोटे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यावरून त्यांनी निवडणूक अधिकारी महेश शेलार यांना जाबदेखील विचारला. तसेच या मतदानानिमित्त भाजपने मोठ्या प्रमाणावर गुंडगिरीचा वापर केल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दांत ताशेरे ओढत आक्षेप नोंदवला आहे.