मोठी बातमी! बारामतीत अखेर दोन्ही पवार भिडलेच; बालक मंदिर केंद्रावर गोंधळPudhari
Published on
:
20 Nov 2024, 8:02 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:02 am
Baramati Politics: बारामती विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात सुरू असलेल्या लढतीत अखेर दोन्ही पवारांच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसले आहे. शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील केंद्रावर अजित पवार व शरद पवार गटात वाद झाला.
या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाच्या चिठ्या वाटल्या जात असून कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला तर हा त्यांचा रडीचा डाव असल्याचे प्रत्युत्तर अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी केला.
महात्मा गांधी बालक मंदिर शाळेत या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून काही काळ मतदान प्रक्रिया थांबली. येथे अजित पवार गटाकडून युगेंद्र यांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा आरोप युगेंद्र यांच्या आई शर्मिला यांनी केला. शिवाय आमच्या बुथवरील कार्यकर्त्यांना तुझ्याकडे उद्या बघतो, तुला उद्या खल्लास करतो अशी धमकी विरोधी गटाकडून दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या प्रकाराचे अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी खंडन केले. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्याकडून असे आरोप केले जात आहेत. वास्तविक मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी हेच उपस्थित राहू शकतात. शर्मिला पवार या तेथे उपस्थित कशा राहिल्या असा सवाल त्यांनी केला. शर्मिला यांनीच येथे आमच्या कार्यकर्त्यांना तु कशाला इथे थांबला, तुझ्या घरचे लग्न आहे का, अशी भाषा वापरल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांची आम्हाला अशी शिकवण नाही, असे गुजर म्हणाले. दरम्यान या प्रकारानंतर अजित पवार यांनीही या केंद्राला भेट दिली.