Published on
:
18 Nov 2024, 6:55 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:55 am
सिन्नर : शहरातील संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरात 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या टपाली मतदान प्रक्रियेदरम्यान एकाने मतपत्रिकेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सिन्नर पोलिस ठाण्यात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी केंद्राध्यक्ष पूनम सचिन शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असे दोन दिवस संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरात सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यरत कर्मचार्यांसाठी टपाली मतदान घेण्यात आले. पूनम शिंदे यांची या ठिकाणी केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक होती. यावेळी रितेश विष्णू उगले यांनी टपाली मतपत्रिका क्र. 100841 वरील यादी क्र. 166, अनु. क्र. 323 यावर मतदान करून सदर मतपत्रिकेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यावर सिन्नर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांच्याकडून केंद्राध्यक्ष शिंदे यांना पत्र प्राप्त झाले. त्यानुसार मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केला म्हणून सिन्नर पोलिस ठाण्यात उगले यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
.. तर मतदारांवर कडक कारवाई
मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणीही मतदान केंद्राच्या मीटरच्या आतमध्ये मोबाइल घेऊन जाऊ नये, आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कोणतीही पोस्ट अथवा कोणत्याही प्रकारचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करू नये. मतदाराकडून असे कृत्य घडल्यास त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार देशमुख यांनी दिला.