EVM चा वापर झाला तरी तिच्या बॅटरीची चार्जिंग जशीच्या तशी:केदार दिघे यांचा गंभीर आरोप, EC महायुतीच्या दबावाखाली असल्याचा आरोप

3 hours ago 1
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गुप्तता पाळण्यात आली नाही. निवडणूक यंत्रणा दबावाखाली काम करत आहे. येथील अनेक मतदान यंत्रांची बॅटरी वापर झाल्यानंतरही जशीच्या तशी दिसून येत आहे, अशी बाब त्यांनी या प्रकरणी निदर्शनास आणून दिली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ठाकरे गटाने त्यांना यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. ते शिंदे यांना आव्हान देतील असे वाटत होते. पण सुरुवातीच्या कलात शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. राज्यातही सत्ताधारी महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे चित्र आहे. ईव्हीएमची चार्जिंग जैसे थे या पार्श्वभूमीवर केदार दिघे यांनी या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गुप्तता पाळण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. ते शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक यंत्रणा दबावाखाली काम करत आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गुप्तता पाळण्यात आली नाही. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम पूर्णतः सील करण्याची गरज होती. पण ते करण्यात आले नाही. तसेच ईव्हीएमचा वापर झाल्यामुळे त्यांची बॅटरीही कमी होण्याची शक्यता होती. पण ही चार्जिंगही कमी झाली नाही. अेक मशीनचे चार्जिंग 99 टक्के होती. यामुळे संशय निर्माण होत आहे. ही विधानसभा निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पण निवडणुकीवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे या प्रक्रियेत न्याय मिळेल असे वाटत नाही. सत्ताधारी पक्षाकडूनही प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग करण्यात आले आहे. साड्या वाटप व इतर प्रकरणे आम्ही उजेडात आणून दिली. पण त्यानंतरही आम्हाला न्याय मिळाला नाही, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे. कोण किती जागांवर आघाडीवर? उल्लेखनीय बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी महायुतीला मोठी आघाडी मिळाली आहे. सद्यस्थितीत महायुतीने 216 जागांवर आघाडी घेतली आहे. यात भाजप सर्वाधिक 126 जागांवर पुढे असून, शिंदे गटाला 55 व राष्ट्रवादी काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी अवघ्या 52 जागांवर पुढे आहे. यात काँग्रेस 22, ठाकरे गट 17 व शरद पवार गट 13 जागांवर आघाडीवर आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article