परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या इसमाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनीच त्याचा अंत्यविधी उरकला असुन सदर इसमाबद्दल काही माहिती असल्यास गंगाखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत अंदाजे ५० वर्षीय इसम गंगाखेड उपाजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी (Gangakhed Crime) दाखल झाला होता. रुग्णालयात त्याने त्याचे नाव अंकुश सूर्यभान देवकते रा. बस स्टँड गंगाखेड असे सांगितले होते. दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अंकुश सूर्यभान देवकते वय ५० वर्ष रा. बस स्टॅन्ड गंगाखेड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवस झाले तरी सदर इसमाचे कोणी ही नातेवाईक रुग्णालयात आले नसल्यामुळे उपाजिल्हा रुग्णालयातील सेवक गोविंद वडजे यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली.
सडपातळ बांधा व काळा, सावळा रंग असलेल्या इसमाच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेतला मात्र त्यांचा काही एक पत्ता न मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पो.शि. राम पडघन यांनी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अंकुश देवकते नामक इसमाचा दि. १९ नोव्हेंबर रोजी गोदावरी नदी काठावर दफनविधी केला. (Gangakhed Crime) अंगात फुल बाह्याचे पांढऱ्या रंगाचे शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट, उजव्या हातात स्टीलचे कडे व पंच धातूची अंगठी असलेल्या इसमाबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर यांनी केले आहे.