Published on
:
27 Jan 2025, 5:03 am
Updated on
:
27 Jan 2025, 5:03 am
नाशिक : नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो हे 'देवा'लाच माहिती, असे सूचक वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय चर्चा करून लवकरच सुटेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात मंत्री महाजन यांच्या हस्ते शनिवारी(दि.२५) शासकीय पूजा पार पडली. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा पार पडते. मात्र यंदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती असल्याने महाजन यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. शासकीय पूजेनंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, 'पालकमंत्रिपदाचा प्रश्न कधी सुटतो हे मला काय माहिती, हे 'देवा'लाच माहिती. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत', असे महाजन यांनी सांगितले. सर्व जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला आहे. फक्त नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. पण हा निर्णय देखील चर्चा करून लवकरच सुटेल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवृत्तीनाथांच्या पुजेचे मला दुसऱ्यांदा योग आला. काल अमितभाई यांच्यासोबत इथे आलो होतो. आज पुन्हा पूजेसाठी आलो. मी चौथ्यांदा इथे पूजा केली. कुंभमेळा मंत्री म्हणून माझे नाव घोषित झाले आहे. आपण सुरक्षित कुंभमेळा करू, आम्ही तयारीला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि.24) नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मालेगाव येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्याशी केलेली 'गुफ्तगू' राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. यासंदर्भात महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, तो कार्यक्रम भाजपचा नव्हता. त्या कार्यक्रमाचे सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. अमित शाह भाजपच्या कार्यक्रमाला आले नव्हते. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. साहजिक आहे अमित शाह यांनी त्यांना खुर्ची दिली. मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.