परभणी जिल्हा व सत्र न्यायाधिश यांचा निकाल
सन २०२३ मधील प्रकरण
परभणी (Girl molester Case) : सेल्समन म्हणुन आलेल्या इसमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एस. नायर यांनी आरोपीला पोक्सो मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, कलम ४५२ भादंवी मध्ये एक वर्ष सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास सुनावला आहे. दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली भोगाव्या असा आदेश देण्यात आला आहे.
या (Girl molester Case) प्रकरणाविषयी अधिक माहिती अशी की, ६ ऑगस्ट २०२३ रोजी पिडीता व तिची आई घरी असतांना दुपारच्या सुमारास आरोपी गुरमीतसिंग उर्फ रिंकुसिंग रणबीरसिंग टाक हा सेल्समन म्हणुन फिर्यादीच्या घरी आला होता. यावेळी त्याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यावर तिची आई आल्यानंतर आरोपीने गालात चापट मारुन पळून गेला. सदर प्रकरणात नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद झाला. सपोनि. सोमनाथ शिंदे यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले.
पिडीता व तिच्या आईने ओळख परेड मध्ये आरोपीला ओळखले. या खटल्यात सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजु मांडली. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अधिकारी म्हणुन पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलिस अंमलदार दत्तराव खुने, प्रमोद सुर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.