मित्राची सायकल ठरली काळ! क्लासमधून घरी येताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू file photo
Published on
:
27 Jan 2025, 4:49 am
Updated on
:
27 Jan 2025, 4:49 am
मडगाव : अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवूनी जाती. दोन दिवसाची रंगतसंगत दोन दिसांची नाती, या गीताप्रमाणे आपल्या क्षणभंगुर आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना आपल्याला नसते. ज्याच्या जन्मासाठी नवस केले, ज्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपले, ज्याचा किलबिलाट घराला घरपण देत होता, ज्याने आताच कुठे किशोरवयात पदार्पण केले होते आणि म्हातारपणाचा आधार म्हणून ज्याच्याकडे ते पाहत होते तो दर्श अवघ्या काही दिवसांचा पाहुणा आहे. याची आई वडिलांना कल्पनाही नव्हती. मित्राला काही होऊ नये म्हणून स्वतः चालवायला घेतलेली ब्रेक नसलेली त्याची सायकल दर्शचा काळ बनली.
कुडचडेच्या मारुती गड परिसरात ही घटना घडली. गुणीवाडा काकोडा येथील दिलीप प्रभुदेसाई यांचा १४ वर्षीय एकुलता एक मुलगा दर्श प्रभुदेसाई याच्या सायकलचे ब्रेक निकामी झाल्यामुळे सायकल संरक्षण भिंतीला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. दर्श याला उपचारासाठी कुडचडेच्या आरोग्य केंद्रातून मडगावातील दक्षिण जिल्हा इस्पितळात दाखल करण्यासाठी नेले जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दर्श हा नववी इयत्तेचा विद्यार्थी होता. सतत हसतमुख चेहरा, अभ्यासात हुशार आणि शालेय उपक्रमातील सहभागांमुळे तो ओळखला जायचा. मारुती गडाच्या पायथ्याशी असलेल्या रहिवाशी इमारतीत दर्श खासगी शिकवणीच्या क्लासला जात होता. दर्श व त्याचे मित्र शिकवणी संपल्यानंतर सायकल घेऊन मारुती गडावर फेरफटका मारून येत असत. शनिवारी शिकवणी संपल्यानंतर तो व त्याचे मित्र दोन सायकल घेऊन मारुती गडावर गेले होते. मारुती गडावरील सरळ चढतीमुळे बऱ्याच वेळा वाहने सुद्धा चढत नाहीत. अशा धोकादायक चढ़तीवरून पेडल मारत सायकल चढवायची त्यांच्यात शर्यत लागत असे. शनिवारी मारुती गडावर आपल्या सायकली चढवल्या होत्या. पण उतरतेवेळी आपल्या मित्राच्या सायकलचे ब्रेक कमी लागतात असे लक्षात आले. तो घाबरला आहे हे पाहून दर्शने स्वतःची चांगली सायकल त्याला चालवायला दिली आणि त्याची ब्रेक कमी लागत असलेली सायकल स्वतः घेतली.
मारुती गडाला वळसा घालून सुरू होणारी खोल उतरती थेट रवींद्र भवन पर्यंत आहे. त्या धोकादायक रस्त्यावर सायकल चालवण्याचा अनुभव असल्यामुळे ब्रेक जरी कमी लागत असले तरीही आपण सहजपणे उतरती पार करू या आत्मविश्वासाने त्याने ती सायकल उतरतीवर घातली आणि आयुष्यातील हा त्याचा शेवटचा सायकल प्रवास ठरला. ब्रेक पूर्णपणे निकामी झाल्यामुळे सायकल वाऱ्याच्या वेगात खाली उतरली. उतरतीवरील वळण काढणे दर्शला शक्य झाले नाही. सायकल त्याच वेगात समोरच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आपटली. त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र दक्ष देसाई हा देखील रस्त्यावर फेकला गेला. अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित झाले होते. या दुर्घटनेची माहिती १०८ रुग्णवाहिका व पोलिसांना देण्यात आली. दोघांनाही कुडचडेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून त्यांना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवले गेले. पण वाटेतच दर्श याचा मृत्यू झाला. तर दक्ष देसाई याला चिंताजनक स्थितीत गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.