गोंदिया /मुंबई (Gondia):- गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वा या गावशिवारातील नाल्याजवळ भंडाराकडून गोंदियाकडे येणारी येणारी शिवशाही बस (Bus)उलटली. ही घटना आज (ता.२९) दुपारी १ वाजता सुमारासची आहे. या घटनेत जवळपास ११ ते १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ३० प्रवासी जखमी आहेत. या भीषण अपघाताने जिल्ह्यात एकच शोककळा पसरली असून मृतकांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच अपघाताची दखल घेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अपघातावर शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
एकनाथ शिंदे यांची घोषणा; शिवशाही एसटी बस अपघात
भंडारा आगारातून शिवशाही एसटी बस क्र.एमएच-०९/ईएम-१२७३ जवळपास ४५ ते ५० प्रवास घेवून गोंदियाकडे निघाली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया मार्गावर डव्वा गावाजवळ शिवशाही बस अपघात होऊन उलटली. या भीषण अपघातात बसमध्ये दबून १३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडताच गावकर्यांनी घटनास्थळावर धाव घेवून मदतकार्य सुरू केले. जवळपास २० फूट रस्त्यापासून बाजूला घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाशांचा बसमध्येच मृत्यू झाला. ३० प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात आणले असून गंभीर जखमींना गोंदिया शासकीय महाविद्यालयात (Gondia Government College) दाखल केले जात आहे.
अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत
या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत असून मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी दिली.