कनेरगाव नाका येथील मराठा वाईनबारच्या बाजूला मटका जुगाराचा अड्डा
कनेरगाव नाका येथील मटका जुगारावर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाचा छापा
बासंबा पोलिसात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
दोन आरोपींकडून ५२ हजार ७७० रूपये जप्त
हिंगोली (Hingoli Crime) : तालुक्यातील कनेरगाव नाका येथील मराठा वाईन बारच्या बाजूला सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने २८ नोव्हेंबरला छापा मारून दोघांवर गुन्हा दाखल करून ५२ हजार ७७० रूपये जप्त केले.
कनेरगाव नाका येथील मराठा वाईन बारच्या बाजूला अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असल्याने यापूर्वीही पोलिसांनी अनेक वेळा छापे मारून गुन्हे दाखल केले. मध्यंतरी याच पथकाने मोठा दारूसाठाही जप्त केला होता. तरी सुद्धा या ठिकाणी अवैध धंदे सुरूच असल्याने त्याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाला मिळाल्याने २८ नोव्हेंबरला या पथकाने मराठा वाईन बारच्या बाजूला मोकळ्या जागेत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर छापा मारला. ज्यामध्ये घटनास्थळी गजानन शंकर नेमाडे याच्याकडून ३८ हजार ९६० रूपये तर सुरेश रामजी कांबळे याच्याकडून १३ हजार ८१० रूपये असे एकूण ५७ हजार ७७० रूपये जप्त करण्यात आले.
याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकातील संग्राम बहीरवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन शंकर नेमाडे, सुरेश रामजी कांबळे रा.कनेरगाव नाका या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना पथकाने ताब्यात घेतले होते. पुढील तपास कावरखे हे करीत आहेत.
अवैध धंद्याला पाठबळ कोणाचे? मुख्य सुत्रधारावर कारवाई होईना
कनेरगाव नाका येथील मराठा वाईन बारच्या बाजूला यापूर्वीही अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांनी छापे मारून गुन्हे दाखल केले होते. पथकाने मध्यंतरी अवैध दारूसाठाही जप्त केला होता. त्यामुळे या अवैध धंद्याला पाठबळ कोणाचे? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. वारंवार गुन्हे दाखल होत असताना या अवैध धंदे चालविणार्या मुख्य सुत्रधारावर कारवाई का होईना, याबाबत मात्र ग्रामस्थांतून उलट-सुलट चर्चांना उधाण येऊ लागले आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणा कडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.