Hingolइसापूर धरणातून 1 ते 22 डिसेंबर दरम्यान तीन पाळ्या देण्यास मान्यता

2 hours ago 1

रब्बी हंगामासाठी

हिंगोली : प्रतीवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-2024 ची आचारसंहिता लागू झाल्याने प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाली.

या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अधीन राहून दि.15 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या धरणातील (964.10 दलघमी) 100 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत रब्बी हंगामात तीन (03) पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात चार (04) पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळालेली आहे.
प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनता व लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करून, जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी सुरू करून पुढील पाणीपाळ्या खालीलप्रमाणे सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.
सन 2024-25 च्या रब्बी हंगामासाठी तीन आवर्तनामध्ये पाणी सिंचनासाठी पाणीपाळी देण्याचे प्रस्तावित आहे. पहिले आवर्तन दि. 01 डिसेंबर ते 22 डिसेंबर, 2024 या कालावधीत 22 दिवस, दुसरे आवर्तन दि. 1 जानेवारी ते 22 जानेवारी, 2025 या कालावधीत 22 दिवस आणि तिसरे आवर्तन दि. 1 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत 22 दिवस इसापूर उजवा व डाव्या कालव्यातून सोडण्याचे प्रस्तावित आहे. पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनांच्या दिनांकात बदल होऊ शकतो. नमुना नं.7, 7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास खालील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल.
लाभधारकांना त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प, अत्यल्प भूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सूचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल. सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरुस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल.
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या, अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे, त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घेऊन उपरोक्त सर्व अटी व नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन अ. बा. जगताप, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1, नांदेड यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article