Published on
:
30 Nov 2024, 4:00 am
Updated on
:
30 Nov 2024, 4:00 am
नाशिक/जळगाव : जळगाव, भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती घेतली असता, तब्बल ४० लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल आढळून आला आहे. संशयित सोनवणे हा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे व किरण माधव सूर्यवंशी (३७, रा. नवीन हुडको, भुसावळ) यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील सोनवणे हा फरार असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुसावळ येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेत शुक्रवारी (दि.२९) सकाळी ७.३० वाजता दोन पंच आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष व्हिडिओ शूटिंगसह त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यामध्ये एक लाख ४९ हजार २९० रुपयांच्या देशी-विदेशी ब्रॅण्डच्या तब्बल दोन हजार १४४ मद्याच्या बाटल्या, अडीच हजार रुपये किमतीची दोन प्लास्टिक कॅनमध्ये २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, दोन लाख १५ हजार २५४ रुपये किंमतीची बुलेट मोटार सायकल, १४ लाखाच्या कारचे कागदपत्रे, दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोने-चांदीचे दागिने, ६० हजार रुपये किमतीच्या नऊ एमएम पिस्टलच्या दहा रिकाम्या पुंगळ्या, तब्बल आठ लाखांची रोकड, तब्बल ९ लाखांच्या सोने-चांदी खरेदी केल्याच्या मूळ पावत्या, नऊ लाखांपेक्षा अधिक किमतीचे टीव्ही, फ्रिज, एसी व इतर आरामदायी वस्तू असा एकूण ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे.
दरम्यान, संशयित राजकिरण सोनवणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून, त्याच्या नातेवाइकांकडे शोध घेऊनदेखील अद्याप त्याची कुठलीच माहिती पुढे येऊ शकली नाही. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घागरे-वालावलकर, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे तपास करीत आहेत.