Published on
:
19 Nov 2024, 5:36 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:36 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : माथेरान येथून खोपोलीमध्ये सुरू असलेल्या यात्रेत मौजमजा करण्यासाठी आलेल्या युवकांवर काळाने घाला घातला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली जवळ यात्रेतून घरी जाणाऱ्या तरूणांची दुचाकी टेम्पोला धडकली. या अपघात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. सोमवारी (दि. १८) रात्री ही घटना घडली. दर्शन वेताळ (वय १६) आणि अजय आखाडे (वय १६), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
दोन स्कूटी वरून सहा तरूण सोमवारी रात्री खोपोलीत यात्रेत आले होते. मौजमजा झाल्यावर एका स्कुटीवरून दर्शन वेताळ, अजय आखाडे आणि प्रथमेश सोनावणे (वय १७) हे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून घरी जात होते. हाळ गावाजवळ आले असता भरधाव वेगात त्यांची स्कूटी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पनवेल येथील एम.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दर्शन वेताळ आणि अजय आखाडे यांचा मृत्यू झाला.