निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांना पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत या विधानसभा निवडणूकीत विजयीची हॅट्ट्रिक केली आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी निलंगा येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करण्यात आले होते. प्रथम टपाली मतदान मोजण्यास सुरुवात केली असता संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आघाडी घेतली होती. यानंतर करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे आघाडीवर होते.
या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच काँग्रेसने भाकरी फिरवली व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या चिरंजीव तथा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांना डावलून काँग्रेसने अभय साळुंखे यांना तिकीट देण्यात आले होते.
आपले आजोबा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपकडून संभाजीराव पाटील निलंगेकर हे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहत त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला. नातवांनी केलेला पराभव जिव्हारी लागल्याने २००९ मध्ये पुन्हा आजोबा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध नातू संभाजीराव पाटील निलंगेकर अशी लढत झाली. या लढतीत मात्र डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे विजयी होऊन नातवांनी केलेल्या पराभवाचा वाचपा काढला.
प्रथमच २०१४ मध्ये काका अशोकराव पाटील निलंगेकर विरुद्ध पुतण्या संभाजीराव पाटील निलंगेकर अशी लढत झाली. यात ३३५११ मतांनी काका अशोकराव पाटील निलंगेकर यांचा संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पराभव केला. पुन्हा २०१९ मध्ये काका अशोकराव पाटील निलंगेकर व पुतण्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात लढत होऊन ३२१४१ मतानी काका अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पुतण्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पराभव केला. व सलग दोन वेळा आमदार झाले.
आजोबा व काका विरोधात आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या एकूण चार लढती झाली असून यातील एकाच लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यामुळे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरानंतर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचेच निलंगा मतदारसंघावर वर्चस्व कायम राहिलेले आहे. आज झालेल्या मतमोजणीत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना १ लाख १२ हजार ६८ मते तर काँग्रेसचे अभय साळुंके यांना ९८ हजार ६२८ इतकी मते मिळाली. शेवटी निवडणूक अधिकारी यांनी आ. संभाजी पाटील निलंगेकरांना १३ हजार ७४० मतांनी विजयी केले.