लातूर (Latur):- ईव्हीएम (EVM)विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav)यांनी पुण्यातील फुलेवाड्यात आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये अंनिसच्यावतीने शनिवारी दुपारी 2 वा. निदर्शने करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे, असे म्हणत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
बाबा आढाव यांच्या पुण्यातील आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने
निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी म्हटले होते. या घटनेचा निषेध म्हणून 94 वर्षीय डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारले. शनिवारी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. बाबा आढाव यांनी गुरूवारी तीन दिवसांसाठीचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. शनिवार त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे.
थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केले
राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करीत तीन दिवस ते उपोषणाला बसले होते. त्याला समर्थन देत लातूर शहरातील गांधी चौक या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने घोषणाबाजी केली व धरणे आंदोलन केले.