शिरूर अनंतपाळ(Latur) :- शिरूर अनंतपाळ तालुक्यात व परिसरात रबी हंगामाचा पेरा शेतकऱ्यांनी नुकताच पूर्ण केला असून, रबी हंगामातील पिके बहरताना दिसत आहेत. पण सध्या ढगाळ वातावरणाचा फटका पिकांना बसताना दिसून येत आहे. या वातावरणामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of disease)झाला आहे. तालुक्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (heavy rain) खरीप पिकांना फटका बसलेला असतानाच आता रबी ज्वारीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
शिरूर तालुक्यात १८५५ हेक्टरवर ज्वारीचा पेरा
तालुक्यात एकूण १३ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर रबी हंगाम पेरणी झालेली असून, त्यामध्ये १ हजार ८५५ हेक्टर वर ज्वारीचा पेरा झालेला आहे. पीक ऐन बहरात असताना अळीमुळे वाढ खुंटण्याची शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप पिकांना ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने फटका बसला होता. सा धारणपणे २७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांना सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावे लागले. हे नुकसान सहन करून शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या उरकल्या. किमान रब्बी हंगामातील पीक हाती लागेल, अशी आशा होती. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पेरा झालेली ज्वारी ही कमरेइतकी वाढलेली आहे. शेतकरी रात्रीचा दिवस करून हे पीक जगवण्याचा प्रयत्न होतोय.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा गेल्या २ ते ३ वर्षांपासून सतत दिसून येत आहे. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. या अळीचा नायनाट करण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेणे आवश्यक आहे. तालुक्यात रब्बी हंगामात साधारणपणे ज्वारीचा पेरा हा १ हजार ८५५ हेक्टरवर करण्यात आला आहे. यंदा हरभऱ्याची क्षेत्र वाढल्याने ज्वारीचा पेरा कमी असला तरी, यंदा चांगल्या प्रमाणात रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे.
एकरी ५ कामगंध सापळे लावा
ज्वारीमध्ये एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. त्यात नर पतंग अडकून पडतील. इमामेक्टीन बेंझोएट हे औषध ४ ग्रॅम तर अलिका हे औषध ३ मिली प्रति १० लिटर पाणी मिश्रित करून पोंग्यामध्ये जाईल, या पध्दतीने फवारावे.
रबी हंगामातील पिकावर नवीन संकट
३ एकर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा केला असून सध्या पीक बहरलेले आहे. मात्र, आता अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नवीन संकट वाढले आहे. परिणामी उत्पादनही घटण्याचे चित्र दिसत आहे. यंदा खरिपाचे पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले असता, आता रब्बी हंगामातील पिकावर हे नवीन संकट आले आहे. यातून कसे बाहेर पडावे हिच चिंता लागली आहे.