Maharashatra Politics : घोडं नेमकं कुठं पेंड खातंय?; शिंदेंच्या मनात तरी काय? पॉलिटिक्समध्ये कुणाचं पारडं जड?

2 hours ago 1

अभूतपूर्व निकालानंतर ही महायुतीच्या खेम्यात अचानक दोन दिवसांपासून स्मशान शांतता पसरली आहे. इतके प्रचंड बहुमत, त्सुनामी, लाट, महापूर असे असतानाही सरकार स्थापन होण्यात इतका उशीर का? असा सवाल नेत्यांनाच नाही तर भरभरून मतदान देणार्‍या मतदारांना सुद्धा पडला आहे. इतना सन्नाट क्यू है भाई? या प्रश्नाला ना भाजपा, ना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस थेट उत्तर देत आहेत. काही तरी, कुठं तरी मुरतंय हे एव्हाना राज्याच्या लक्षात आले आहे. शिंदेंनी दाढीवरून हात फिरवल्याने भाजपाचं टेन्शन वाढलं आहे का? की एकनाथ शिंदे हे राज्याच्या राजकारणात नसतील तर प्रशासनासह इतर यंत्रणेवर धाक असणारे अजितदादा वरचढ ठरतील ही भीती आहे. की राज्यातील दोन प्रमुख मराठा नेते नवीन सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याने दूर आहेत, असे अनेक प्रश्न राज्याला पडले आहेत. सत्ता पटलावर सध्या चाणाक्ष पणे चाली खेळण्यात येत आहेत. कदाचित दोन दिवसांत बरेच चित्र स्पष्ट झालेले आहे. पण सन्नाटे को चीरती सनसनी, एक वेगळी वार्ता येऊन धडकणार हे नक्की.

एकनाथ शिंदे यांचा डावपेच

एकनाथ शिंदे यांनी कुशलतेने गेल्या अडीच वर्षात भाजपालाच नाही तर राष्ट्रवादीसोबत संसार केला. लाडका भाऊ अशी आपली प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनीच सांगीतले आहे. जर नवीन सरकारमध्ये लाडक्या भावाला योग्य मान मिळत नसेल तर नाराजीची चर्चा होणारच. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी सुचवले आहे. ते मंत्रिमंडळात सहभागी होण्याची चिन्ह नाहीत. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपासमोर त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

तर अजित पवार यांच्या सारख्या मुरब्बी नेत्यापुढे उमद्या श्रीकांत शिंदे यांना काम करायला लावणे हे भाजपासह शिवसेनला पण अडचणीचे आहे. अजितदादांची प्रशासन आणि यंत्रणेवर मजबूत पकड आहे. दादांची काम करण्याची हतोटी सर्वांनाच माहिती आहे. कामाचा हुरूप आणि झटपट उरक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. दादांना प्रशासनात वरचढ करण्याचा धोका भाजपा घेऊ शकत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पॉवर गेमिंग ते बार्गेनिंग

तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाऐवजी महत्त्वाची खाती गमवण्याची भीती पण भाजपासमोर आहे. या पॉवर गेमिंग आणि पॉवर बार्गेनिंगमध्ये भाजपासमोर अजून एक मोठे आव्हान म्हणजे, मराठा चेहर्‍यांना सापत्नक वागणूक दिल्याचा मोठा डाग लागण्याची भीती ही आहे. जर सत्ता संतुलनात दोन्ही मराठी मातब्बर नेत्यांना दुय्यम स्थान दिल्या जात असले तर तो थेट संदेश जनतेत जाईल. त्यामुळे सत्ता संतुलनात बार्गेनिंग पॉवरमध्ये भाजपाला काही न गमवता बरंच काही मिळवण्याची चाल खेळावी लागणार आहे. भाजपा सध्या महायुतीत सर्वात मोठा भाऊ आहे. पण या मोठ्या भावाने दोन लहान भावांचे हित जपले नाही तर भाजप हा केसाने गळा कापतो, या विरोधकांच्या आरोपाला बळकटी मिळेल.

तीन तिघाडा काम बिघाडा

महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कोणताचे मतभेद नाही असा सूर सुरूवातीलाच आळवण्यात आला. दादा गटाने तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. तर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतून होईल असे घोडे दामटले. आता मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर गृह खाते आणि महत्त्वाची खाती मिळावीत अशी रास्त अपेक्षा करण्यात गैर काय आहे असा त्यांचा धोसा असू शकतो. तर राज्याच्या तिजोरीची चावी आणि ग्रामीण विकास, महसूल खात्यावर राष्ट्रवादीचा दावा असू शकतो. या तिढ्यात सध्या सत्ता स्थापनेला मुहूर्त लागत नसल्याचे दिसते.

तर सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी अगोदर मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करणार, तो चेहरा जाहीर करण्याची मागणी केल्याचे कळते. अर्थात देवेंद्र फडणवीस यांचे कसब पाहता त्यांचीच दावेदारी मजबूत आहे. मग भाजपा गटनेते पदासाठी इतका वेळ का लावत आहे, असा प्रश्न दोन्ही मित्र पक्षांना पडला आहे. आता भविष्याच्या उदरात काय आहे हे लवकरच समोर येईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article