विधानसभा निवडणुकीचे निकाल अखेर समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला आहे, तर महायुतीला मोठं यश मिळालं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या वेळी भाजपचे 105 उमेदवार निवडून आले होते, मात्र यावेळी भाजपनं तब्बल 130 चा आकडा गाठला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जवळपास 56 जागांवर आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील चाळीसच्या आसपास जागा जिंकण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला तसेच मुख्यमंत्री कोण होणार यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आम्ही जे निर्णय घेतले ते न भुतो न भविष्यते असे आहेत. त्यामुळे लोकांनी आमच्यावर मतांच्या प्रेमाचा वर्षाव केला. विकासाला आम्ही प्रधान्य दिलं, बंद केलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली. यामागे आमचा उद्देश एकच होता की राज्याला पुढे न्यायाचं आहे. आम्हाला जनतेचं प्रचंड बहुमत मिळालं आहे, त्यामुळे आता आम्हाला आणखी जबाबदारीनं काम करावं लागणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, वयोश्री योजना आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांना वीज बील माफ केलं.
लाडक्या बहीण योजनेवरून विरोधकांनी आमची खिल्ली उडवली, एवढे पैसे कुठून आणणार असा सवाल त्यांनी केला. मात्र लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली. पराभव झाला की आता ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात होईल, असा टोलाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही तीनही पक्ष बसून त्याबाबत निर्णय घेऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हलटं आहे.