‘होम ग्राउंड’वर दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणालाFile Photo
Published on
:
19 Nov 2024, 4:48 am
Updated on
:
19 Nov 2024, 4:48 am
सुहास जगताप
Political News: पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पवारांच्या ‘होम ग्राउंड’वर अत्यंत जोरदारपणे प्रचार झाला असून, सर्व दहाही मतदारसंघांतील लढती पाहता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लढती अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळ, भोर, इंदापूर, पुरंदर या मतदारसंघांत अपक्षांनी मुख्य उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
प्रचाराच्या काळामध्ये दोन्ही पवारांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार केलेला आहे. या दोन्ही नेत्यांनी आपल्या उमेदवारांना मोठी रसद पुरवलेली आहे.
आपलेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि आपल्या होम ग्राउंडवर आपले वर्चस्व राहील, यासाठी हे दोन्ही नेते कसून कामाला लागलेले दिसून आले. यामुळे या दहाही मतदारसंघांतील लढती या अतिशय चुरशीच्या होणार आहेत. आता 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठीची यंत्रणा दोन्ही पवारांनी तयार केलेली आहे.
पवारांच्या ‘होम ग्राउंड’वर प्रथमच हे दोन नेते आमने-सामने आलेले आहेत. पवारांच्या घरातच फूट पडल्यामुळे प्रथमच पुणे जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे. एकत्रित राष्ट्रवादी आणि एकत्रित पवार कुटुंब असताना पुणे जिल्ह्यामध्ये कधीच एवढ्या चुरशीच्या लढती झाल्या नव्हत्या, बहुसंख्य लढतींचा निकाल तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच ठरलेला असायचा. एखाद् दुसर्या मतदारसंघामध्ये स्थानिक नेत्यांच्या एकमेकांतील स्पर्धेतून चुरस व्हायची, परंतु आता दहाही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस आहे. प्रत्येक उमेदवाराचा जीव टांगणीला लागलेला आहे.
शरद पवारांनी आपल्याला धोका देणार्या आमदारांना धडा शिकवण्याचा निर्धार केलेला आहे, तर अजित पवार यांनी आपल्याला साथ देणारे आमदार विजयी झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे दोन्ही नेते विधानसभेच्या या मैदानात अत्यंत कसून आणि तयारीने उतरल्याचे दिसले, त्यामुळे विधानसभेच्या या मैदानात मोठा कसून प्रचार झालेला आहे.
शरद पवार, अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचाराचा धडाका लावलेला होता. अजित पवारांनी एकहाती पुणे जिल्ह्यामध्ये प्रचाराची यंत्रणा सांभाळलेली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातीलच स्टार प्रचारक नव्हता. शरद पवारांकडे अमोल कोल्हे यांच्या रूपाने जिल्ह्यातीलच एक स्टार प्रचारक असल्याने त्यांची बाजू प्रचारांमध्ये थोडी उजवी होती.
परंतु, अजित पवार यांनी कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रचार यंत्रणा हलवलेली आहे. आता 23 तारखेलाच मतदानातून नक्की काय होणार, हे समजेल. परंतु, स्वतःच्या होम ग्राउंडवर या दोन्ही पवारांचा या निवडणुकीमध्ये कस लागलेला आहे आणि जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व राहणार, हे 23 तारखेला समजून येईल. महायुती आणि महाआघाडीसमोर उघड आणि छुपी बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान होते. त्याच दोन्ही राजकीय गटांना फारसे यश मिळालेले नाही.
बारामती मतदारसंघात पवारांच्या घरातच सुरू असलेल्या लढतीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना ही लढतही त्याच प्रकारे लढली गेली आहे. या निवडणुकीत प्रथमच शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांनी पार वाडीवस्तीपर्यंत जाऊन प्रचार केला आहे. अजितदादा की शरद पवार, या पेचात 1967 नंतर प्रथमच बारामतीकर अडकले आहेत.
लोकसभेला अजित पवारांना कात्रजचा घाट दाखवल्यावर शरद पवारांनी आता विधानसभेला याचा वचपा काढण्याचे ठरवून अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र यांनाच उभे करून अजित पवार यांच्यासमोर कडवे आव्हान बारामतीत उभे केले आहे. प्रचारही त्याच ताकदीचा झालेला आहे. प्रचाराच्या काळामध्ये पवार घराण्यातील वाकयुद्धही चांगलेच रंगले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई यासुध्दा आपला नातू युगेंद्रच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसले.