Published on
:
21 Nov 2024, 8:03 am
Updated on
:
21 Nov 2024, 8:03 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम मतदारसंघातील गुरू तेग बहादूर मतदान केंद्रावर बुधवारी (दि. २०) दुपारी महायुतीचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी शिरसाट यांना मशाल दाखवत घोषणाबाजी केली. त्यामुळे चिडलेल्या शिरसाट यांनी मस्ती आला का, नीट करील, असे म्हणत या कार्यकर्त्यांना दम भरला.
महायुतीचे उमेदवार शिरसाट हे मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देत फिरत होते. दुपारी ते उस्मानपुरा भागातील गुरू तेग बहादूर शाळेच्या मतदान केंद्राजवळ आले. त्यावेळी ठाकरे गटाच्या नितीन पवार व इतर कार्यकर्त्यांनी मशाल चिन्ह दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे संतापलेले संजय शिरसाट नितीन पवार यांच्याजवळ गेले.
तिथे गेल्यावरही घोषणाबाजी सुरू राहिल्याने शिरसाट यांनी मस्ती आली का, नीट करील साल्या, असे म्हणत दम भरला. त्यानंतर इतरांनी मध्यस्ती केल्याने वाद शांत झाला. काही वेळाने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट देऊन नितीन पवार व इतर कार्यकर्त्यांची विचारपूस केली.