Published on
:
18 Nov 2024, 7:51 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:51 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागात विविध परवानगीसाठी सुरू असलेल्या एक खिडकी कक्षात अनेक उमेदवारांकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात येत असून सोमवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी वेळ असल्याने अनेक उमेदवारांच्या प्रतिनिधीनी प्रचारासाठी आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केलेले आहे. प्रचाराचा जोर चांगलाच चढलेला दिसून येत आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांनी वाहन, सभा, रॅली अशा विविध प्रकारच्या परवानगीची मागणी एक खिडकी कक्षाचे कक्षप्रमुख विनोद मगरे यांच्याकडे प्राप्त झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी ब्रीजेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मतदारसंघांमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध परवानग्या देण्यात येत आहे. सदरील कक्षात रामेश्वर डव्हळे, भरत मोरे, आकाश घुगे, वैभव मरकड, ज्ञानेश्वर काळे या सर्व एक खिडकी कक्षातील अधिकारी- कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडत आहे. दरम्यान मतदारांनी (दि.२०) रोजी नव मतदार व मतदार यांनी मतदानाचा हक्कम बजवावा, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कृष्णा कानगुले यांनी केले.
प्रचार कालावधीनंतर बाहेरून आलेल्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज सोमवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर संबंधित मतदारसंघाचे मतदार नसलेले आणि बाहेरून आलेले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती, प्रचाराकरिता आलेले स्टार प्रचारक यांना शहरात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी रविवारी (दि.१७) रात्री उशिरा काढले आहेत.