Published on
:
21 Nov 2024, 10:52 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:52 am
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: आमदार निवडून देण्यासाठी शहरासह तालुक्यातील मतदारांची लगबग आणि उत्साह बुधवारी कार्यकत्यांनाही ऊर्जा देणारा ठरला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.
शहरातील कष्टकऱ्यांच्या वसाहती असलेल्या भागात सकाळपासून मतदानासाठी गर्दी होती. या परिसरात कार्यकर्त्यांचीही दिवसभर धावपळ सुरू होती. यात ख्वाजान्यार, इंदिरानगर, भीमनगर, तुळजापूर नाका, सांजार- ोड यांसह लगतच्या परिसरातही मोठा उत्साह होता. तर समतानगर, समर्थनगर, आनंदनगर, शांतीनिकेतन कॉलनी, बार्शी नाका परिसरातही मतदारांत उत्साह होता. सर्वत्र मतदारांनी सकाळी सातपासून मतदानासाठी मतदान केंद्र गाठले.
नावे गायब झाल्याच्या तक्रारी
दरम्यान या निवडणुकीतही अनेक केंद्रांवर मतदारांची नावे यादीतून गायब असल्याच्या तक्रारी दिसून आल्या. जुनी जिल्हा परिषद मतदान केंद्रावर काही नागरिकांनी अशा तक्रारी केल्या.
पोलिसांशी वाद
दरम्यान, याच केंद्रावर काही महिला पोलिसांनी मतदारांशी मोबाईल नेण्यावरून वाद घातल्याचे प्रकारही सातत्याने घडत होते. यावर काही वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
ग्रामीण भागातही उत्साह
दरम्यान, सारोळा, सांजा, चिखली, केशेगाव आदी गावांत दुपारपर्यंत ४० टक्केहून अधिक मतदान झाले होते. सारोळा गावात महिला मतदारांची रांग जिल्हा परिषदेच्या केंद्रावर लागली होती. तर सांजा गावातील चारही बूथवर अशीच अवस्था होती. चिखली, केशेगाव येथे दुपारी तीनपर्यंत चुरशीने मतदान झाले.