Published on
:
20 Nov 2024, 7:40 am
Updated on
:
20 Nov 2024, 7:40 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीत मतदार हा राजा आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत होण्यासाठी या मतदारराजाने मतदानाचा हक्क बजावणेही आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरू असून, मतदारांच्या स्वागतासाठी आता मतदान केंद्रांवर रेड कार्पेटही अंथरण्यात आले आहे. यासह मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांच्या विश्राम सुविधेचे हे आदर्श मतदान केंद्र आहे.
शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २९६ समर्थनगर, एम.पी. लॉ कॉलेज निराला बाजार येथे हे आदर्श मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी पाणी, आरोग्य अशा मूलभूत सोयीसुविधांसह लहान मुलांसाठी खास नियोजन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या स्वागतासाठी अगदी प्रवेशव्दापासून रेड कारपेट अंथरण्यात आले आहे. मतदार केंद्राच्या आतही सगळीकडे रेड कारपेट अंथरले आहे. सुंदर सजावटही केली आहे. मतदारांसोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आणि मनोरंजन साहित्यही उपलब्ध केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आराम करता यावा, याबाबतची खबरदारी घेतली आहे. मतदारांच्या सोयीसुविधेची पुरेपूर काळजी घेतलेले हे आदर्श मतदान केंद्र आहे.
सखी आणि पर्यावरण स्नेही मतदान केंद्र
मध्य विधानसभा मतदारसंघातील ३२० मतदान केंद्र आहे. यापैकी एक आदर्श मतदान केंद्रासह केवळ महिला कर्मचारी असलेले सखी मतदान केंद्र आहे. मतदान केंद्र २९५ एम. पी. लॉ कॉलेज आणि २९६ पैठणगेट शारदा मंदिर प्राथमिक शाळा हे केंद्र आहे. मतदान केंद्र १८५ किलेअर्क शासकीय महाविद्यालय हे पर्यावरणपूरक बनवले आहे. तसेच मतदान केंद्र ३११ विवेकानंद कॉलेज हे दिव्यांग मतदान केंद्र दिव्यांग बांधवांचे मनोबल वाढवण्यासाठी केले आहे.