Published on
:
21 Nov 2024, 10:36 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:36 am
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मोठ्या चुरशीने मतदान झाले. विधानसभेसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. दुपारी १ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. निवडणूक विभागाने दिलेल्या सायंकाळी पाच वाजेच्या आकडेवारीनुसार वसमत विधानसभा मतदार संघात ५९.६७ टक्के, हिंगोली विधानसभा मतदार संघात ६०.६२ टक्के तर कळमनुरी विधानसभा मतदार संघात ६३.२० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात सरासरी ६१.१८ टक्के मतदान झाले.
हिंगोली जिल्ह्यात एकूण ९ लाख ८४ हजार ७६४ मतदार होते. त्यापैकी ५ लाख १० हजार ३९३ पुरुष, ४ लाख ७४ हजार ३६१ महिला तर १० तृतीयपंथी मतदार तसेच ६ हजार १२६ दिव्यांग मतदार व ८५ वर्षापुढील १५ हजार १४८ मतदार होते. मतदान प्रक्रियेसाठी ४ हजार कर्मचाऱ्यांसह २ हजारहूह्न अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात एकूण १ हजार २३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
यामध्ये तीन मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच आठ मतदान केंद्र सहायक केंद्रे म्हणून स्थापन करण्यात आली होती. जिल्ह्यात वसमत तालुक्यातील किन्होळा येथील १ मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित ३, दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचलित ३ तर युवा कर्मचाऱ्यांमार्फत ३ असे एकूण ९ आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
कळमनुरी विधानसभा मतदार संघात ३५२, हिंगोली विधानसभा मतदार संघात ३४३ तर वसमत विधानसभा मतदारसंघात ३२८ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. हिंगोली, कळमनुरी व वसमत विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात मतदान सुरू करण्यापूर्वी झालेल्या मॉक पोलमध्ये २१ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे काही ठिकाणी मतदान यंत्रे वापरून मतदान सुरू करण्यात आले. हिंगोली शहरासह जिल्हयात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४६ टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले.