रायगडच्या गावागावातील पारा ,पारावर आणि शहरातील चौका चौकात एकच खुमासदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे आली समिप घटिका,कोण जिंकणार निवडणुका.file photo
Published on
:
19 Nov 2024, 8:22 am
Updated on
:
19 Nov 2024, 8:22 am
अलिबाग ः विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती बुधवारी (20 नोव्हेंबर) होणार्या मतदानाची. यामुळे सध्या रायगडच्या गावागावातील पारा ,पारावर आणि शहरातील चौका चौकात एकच खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे आली समिप घटिका, कोण जिंकणार निवडणुका. उर्वरित दोन दिवसात छुप्या पद्धतीने होणार्या प्रचारावरही प्रशासनाने करडी नजर ठेवली असली तरी निवडणुकीच्या रणांगणात माहिर असलेले कार्यकर्ते इप्सित साधताना दिसत आहेत.
रायगडातील प्रचार अखेरच्या दोन दिवसात जास्त रंगल्याचे दिसून आले.पहिल्या आठवड्यात जाहीर सभांपेक्षा सर्वच राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी गावोगावी कॉर्नरसभा, गावबैठका घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अर्थात सर्वच मतदार संघांची व्याप्ती पाहता सर्वच मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची झालेली दमछाकही नजरेस पडली.पण सर्वांनीच निदान कार्यकर्ते, मोबाईल,सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित केला.
आता अखेरच्या दोन दिवसात सर्वच उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.प्रचाराला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असले तरी एक दिवसाचा राजा असलेल्या मतदाराच्या मनात नेमके काय सुरु आहे याचा अंदाजच या दोन दिवसात दिसून येणार आहे.यासाठी आवश्यक ती जोडणी सर्वच उमेदवारांकडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे दिसून येत आहे.रात्री,अपरात्री,दिवसा कधीही उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांशी हितगुज साधताना दिसू लागले आहेत.यामुळे आता मतदारही घरातून बाहेर पडताना दिसत नाही.उलट कधी दरवाजाची कडी वा बेल वाजते,मोबाईलची रिंग येते याकडे चतुर मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
यंदाच्या निवडणुकीची सर्वार्ंनाच उत्सुकता लागली आहे.पक्षांपक्षामध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे आपल्या बाजुने किती मतदार आहेत हे यावेळी दिसून येणार आहे.लोकसभा निवडणुकीत रायगडात महायुतीला जरी विजय मिळाला असला तरी तोच ट्रेंड विधानसभेला चालणार नाही हे सर्वार्ंनाच ठाऊक आहे.त्यामुळे अनेक राजकीय पक्षांना,नेत्यांना आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी या निवडणुकीत जीवाचे रान करावे लागल्याचेही दिसून आले आहे.यामुळे जे या निवडणुकीत जिंकतील तेच रायगडच्या राजकारणात यापुढे टिकतील असे अधोरेखित झाल्याने निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांनी अथक प्रयत्न सुरु केल्याचेही दिसून आले आहे.