देशाच्या राजकारणात काही नेत्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला. त्यात एन. टी. रामाराव, बाळासाहेब ठाकरे, मुलायमसिंह यादव, करुणानिधी, एच. डी. देवेगौडा, प्रकाश सिंग बादल, शरद पवार यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांमधील साम्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या पक्षांवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांच्याच कुटुंबियांमध्ये कुटुंबकलह आणि संघर्ष झाला. जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर वर्षभरात जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार महायुतीसोबत गेले. त्यानंतर शिवसेनेप्रमाणे खरी राष्ट्रवादी कोणाची यासाठी लढाई सुरु झाली. त्या लढाईत निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने दिला. परंतु लोकसभा निकालाचा निर्णय शरद पवार यांच्या बाजूने लागला होता. आता विधानसभेचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागला.
राज्यातील वर्तमान राजकारणात पवार आणि ठाकरे कुटुंब यांचे वर्चस्व सर्वाधिक राहिले आहे. त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे वलय राज्यातील राजकारणात होते. तसेच वलय शरद पवार यांचे आहे. पक्ष फुटल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार यांनी महाराष्ट्र पालथा घातला. त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. परंतु विधानसभा निवडणुकीपर्यंत हे यश त्यांना टिकवता आले नाही.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष केवळ १३ जागांवर विजय मिळवत असल्याचे कलामधून दिसत आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३५ जागांवर विजय मिळवत असल्याचे दिसत आहे. यामुळे खरी राष्ट्रवादी म्हणून जनतेने अजित पवार यांना मान्यता दिली आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली होती. परंतु बारामतीकरांची पसंती अजित पवार यांना राहिली आहे.