विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. त्यानंतर आता मतदारसंघनिहाय एक्झिट पोल समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदार संघात कांटे की टक्कर होती. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य या निवडणुकीत आमने-सामने आहेत. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागं आहे. लोकसभा निवडणुकीला देखील पवार कुटुंबातील दोन सदस्य सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे या विजयी झाल्या तर आता विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात काका विरोधात पुतण्या अशी लढाई पाहायला मिळत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, आता मतदानानंतर एक्झिट पोल हाती आले आहेत. टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यात 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 136-145 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यात अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यात 23 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात असा अंदाज आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यात 42 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पोल डायरीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यात 18 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लागलं आहे. ही निवडणूक जरी अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये असली तरी देखील या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासमोर तगडं आव्हान असल्यामुळे त्यांना बारामती सोडून इतर मतदारसंघात फारसा प्रचार करता आला नाही, इक्झिट पोलच्या अंदाजानुसार त्याचा फटका त्यांच्या पक्षाला इतर ठिकाणी बसल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कमी जागा येण्याचा अंदाज आहे.