एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा; शिंदे गटाच्या खासदाराची मागणीImage Credit source: Facebook
राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. निवडणुकीच्या निकालाच्या कलात महायुतीला बहुमतापेक्षाही बंपर सीट मिळताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं दिसून येत आहे. कल हाती येताच भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत आता मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 बाय 7 म्हणजे 365 दिवस काम करत होते. त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आता आम्हाला हॉटेलबिटेल बुक करण्याची गरज नाही. सर्व आमदार येतील. महायुतीचंच सरकार येणार आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.
तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे
मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल केला असता नरेश म्हस्के यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढली आहे. शिंदेच आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहोत, असं महायुतीचे सर्व नेते म्हणत होते. मला वाटतं ते आमचे नेते, मी त्या पक्षाचं काम करतो. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, मला तसं वाटतं. तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे. मी माझं मत मांडलं, असं नरेश म्हस्के यांनी ठामपणे सांगितलं.
खरी शिवसेना आमचीच
शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी खूप मेहनत केली. त्यांनी प्रत्येक वर्गासाठी ज्या योजना आणल्या, दिवस रात्र काम केलं. त्याचा परिणाम म्हणजे हा निकाल आहे, असं सांगतानाच खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना सुरू केली होती. त्याचं नेतृत्व करण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम असल्याचं राज्यातील लोकांनी या निकालातून स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राऊतांना जोडे मारतील
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने संजय राऊत यांना जोडे हाणले आहेत. शरद पवार यांचे उंबरठे झिजवणे, सोनिया गांधी यांचं मांडलिकत्व स्वीकारणं आणि उद्धव ठाकरे यांच्या वाताहातीला संजय राऊत जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे एकेकाळी आमचे नेते होते, त्यांची ही दशा झाली आहे. आता तरी त्यांनी दिशा घ्यावी. राऊत सारख्या माणसामुळे उद्धव ठाकरे यांची वाताहत झाली आहे समोर आलं आहे. राऊत यांना प्रत्यक्ष तोंडावर जोडे मारायचे बाकी आहे. आता राज्यातील जनता त्यांना जोडे मारतील, असंही ते म्हणाले.