विधानसभेच्या 12 मतदारसंघांतून विद्यमान अकरा आमदारांसह 151 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमित भांगरे व अपक्ष उमेदवार माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह 9 उमेदवार रिंगणात आहेत. संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अमोल खताळ यांच्यासह 13 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. शिर्डी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्यासह 8 उमेदवार, कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वर्पे यांच्यासह 12 उमेदवार, श्रीरामपूर मतदारसंघातून आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, हेमंत ओगले काँग्रेसकडून, तर शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह 16 उमेदवार नशीब आजमावत आहेत.
नेवासा मतदारसंघातून आमदार शंकरराव गडाख, शिवसेनेचे विठ्ठल लंघे, प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह 12, शेवगाव मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले अपक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांच्यासह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार प्राजक्त तनपुरे, भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राणी नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते, अपक्ष उमेदवार माजी आमदार विजय औटी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांच्यासह 12 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
अहमदनगर शहर मतदारसंघातून 14 उमेदवार आमनेसामने आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर यांच्यासह 14 उमेदवार तर श्रीगोंदा मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे अनुराधा नागवडे, भाजपचे विक्रम पाचपुते व अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह 11 उमेदवार नशीब आजमावत आहेत.