Published on
:
29 Nov 2024, 10:07 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:07 am
नागपूर - सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग पारदर्शी असल्याचे सांगितले जाते, मात्र राज्यातील आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय २ वर्ष लागत नाही. पण ईव्हीएम कशी योग्य, याविषयीचा निर्णय २ तासात दिला जातो. यावरून ईव्हीएमवरचे प्रेम लक्षात येते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शुक्रवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. निवडणूक आयोग पारदर्शी नाही हा माझा आरोप असल्याचे पटोले म्हणाले.
लोकांच्या मतापेक्षा मशीन सत्ताधाऱ्यांना प्रिय झाली आहे. ही व्यवस्था लोकशाहीसाठी घातक असून या विरोधात आम्ही रस्त्यावर तसेच न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असे सांगितले. निवडणूक आयोगावर मी जे प्रश्न केले त्याला अयशस्वी उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. २० तारखेला रात्री जे मतदान झाले, यात दोन दिवसात पुन्हा वाढ केली. ९ लाख ९९ हजार ३५९ मते वाढली, हे दुसऱ्या दिवशी जाहीर केली.
''सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटते मला माहिती नाही. माझा मशीनवर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आम्हाला आक्षेप आहे. ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने गांभीर्याने घेतली असून आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. आमच्या बाजूने निकाल असता तरी हा मुद्दा आम्ही घेतला असता. मुळात जनतेची भीती सरकारच्या मनात नाही. बहुमत मिळूनही सरकार स्थापन झालेले नाही.''
''कापूस, धान, सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झाली नाही. कर्मचारी, अधिकारी सत्ताधाऱ्यांचे डमरू वाजवतात, अशामुळे लोकशाही धोक्यात येणार आहे. मला लोकशाहीवर बोलायचं आहे. बंटी शेळके यांची नाराजी ही पक्षातील बाब आहे ती नंतर बघू असे सांगितले. कोण मुख्यमंत्री बनेल हे भाजपचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील, त्यावर आम्ही बोलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.''