चांदवड : येथील जे. आर. जे. शाळेत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी महिलांनी केलेली गर्दी,(छाया : सुनील थोरे)
Published on
:
21 Nov 2024, 9:21 am
Updated on
:
21 Nov 2024, 9:21 am
चांदवड : चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) सायंकाळी 6 पर्यंत एकूण 3 लाख 8 हजार 808 मतदारांपैकी 2 लाख 37 हजार मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्याने दिवसभरात 76.81 टक्के मतदान झाल्याची माहिती चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांनी दिली.
डॉ. राहुल आहेर व शिरीषकुमार कोतवाल हे एकमेकांशी हस्तांदोलन करताना.(छाया : सुनील थोरे)
मतदारसंघातील 306 बूथ केंद्रांवर बुधवारी (दि.20) सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात करण्यात आली. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर नागरिकांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. सकाळी 9 पर्यंत अवघे 6.49 टक्के मतदारांनी मतदान केले होते.
दिवस जसजसा उगवत केला तसतसा नागरिकांचा जोर मतदान करण्यासाठी वाढत गेला. सकाळी 11 पर्यंत 21.30 टक्के मतदान पार पडले. त्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केल्याने दुपारी 1 ला 34.19 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजता 51.06 टक्के मतदान झाले. दुपारी 4 नंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 5 पर्यंत मतदारसंघात एकूण 62.42 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 पर्यंत मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांना शाळेच्या गेटमध्ये घेत सर्व मतदान रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, सीआरपीएफचे जवान आदींनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर, महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल, प्रहार जनशक्तीचे उमेदवार गणेश निंबाळकर, अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनी मतदारसंघातील बूथ केंद्रावर जात मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
चांदवड : सपत्नीक मतदान करताना अपक्ष उमेदवार केदा आहेर. (छाया : सुनील थोरे)
मतदान करताना प्रहारचे गणेश निंबाळकर सपत्नीक.(छाया : सुनील थोरे)
मतदारांना हात जोडून आवाहन
मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मतदान करण्यासाठी येणार्या नागरिकांना उमेदवार हात जोडून नमस्कार घालताना यावेळी दिसून आले.