नाशिक : देवळाली मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदारांची लागलेली रांग.(छाया : सुधाकर गोडसे)
Published on
:
21 Nov 2024, 10:41 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:41 am
नाशिक : देवळाली मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. सायंंकाळीही मतदारांच्या रांगा कायम असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देवळालीत महाविकास आघाडी अन् महायुती यांच्यात थेट लढत आहे. महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ. सरोज अहिरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार योगेश घोलप हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. राजश्री अहिररावही निवडणूक लढवित आहेत.
पाथर्डी विल्होळी, गिरणारे, दरी, मातोरी देवळाली आदी गावांमध्ये मतदान सुरळीत पार पडले. बुधवार (दि.20) सकाळी ११ नंतर मतदानाला वेग आला. दुपार दोनपर्यंत 30 टक्के मतदान झाले.
गिरणारेत मतदान केंद्रप्रमुखांना उच्च रक्तदाबाचा त्रास
गिरणारे येथील निवडणूक केंद्रप्रमुख कल्पना पाळदे यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना त्वरित आरोग्य पथकाने ग्रामीण रुग्णालयात अन् त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची जागा रिक्त झाल्याने निवडणूक कर्मचार्यांनी राखीव केंद्रपमुखाची क्षेत्रीय अधिकार्यांकडे मागणी केली. मात्र, राखीव केंद्रप्रमुख न पोहोचल्याने कर्मचार्यांच्या कामावरील ताण वाढल्याचे दिसून आले.
माजी महापौर नयना घोलपांची हजेरी अन् अनेकांचा काढता पाय
विहितगाव येथील नाक्यावर सायंकाळी 5 वाजता पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. पैसे वाटप होत असल्याचे कळताच माजी आमदार योगेश घोलप यांच्या बहीण माजी महापौर नयना घोलप यांनी नाक्यावर कार्यकर्त्यांसह हजेरी लावली. यानंतर काही काळ या ठिकाणी तणाव दिसून आला. नयना घोलप यांनी हजेरी लावताच अनेकांनी येथून काढता पाय घेतला.
बोगस मतदानाचा आरोप; ठाकरे गट आक्रमक
विहितगाव येथील शाळा क्रमांक 64 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याठिकाणी मतदानासाठी आलेल्या अक्सा साहिल खान यांचे मतदान अगोदरच झाल्याचे दिसताच ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या. त्यांनी केंद्रप्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर अक्सा साहिल खान यांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्रप्रमुखांनी त्यांचा प्रदत्त मतदान फॉर्म (टेंडर वोट) भरून घेतला.
शाळा क्र. 64 मध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड
देवळालीतील विहितगाव येथील शाळा क्रमांक 64 मध्ये खोली क्रमांक 3 मध्ये दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने सुमारे 50 ते 60 मतदारांना 20 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. केंदप्रमुखांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर 4 वाजून 10 मिनिटांनी मशीन सुरू करण्यात आले. 20 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबल्याने खोलीबाहेर मतदारांच्या 3 रांगा लागल्या.
सायंकाळी 5 नंतर मतदानासाठी गर्दी
दुपारी मतदान संथगतीने सुरू असताना अचानक सायंकाळी 5 नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत असल्याचे दिसून आले. सायंकाळी 5 नंतर अनेक मतदारांना लक्ष्मी दर्शन घडविण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. सायंकाळी 5 नंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढल्याने निवडणूक कर्मचार्यांकडून मतदारांना टोकण देण्यात आले.