नांदगाव : मतदान केंद्रावर झालेली गर्दी(छाया : सचिन बैरागी)
Published on
:
21 Nov 2024, 9:42 am
Updated on
:
21 Nov 2024, 9:42 am
नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघतील 341 केंद्रांवर सकाळी 7 पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली होती. तालुक्यातील काही भागांतील अपवाद वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
नांदगाव : मतदानासाठी आलेल्या शंभरी पार केलेल्या सुमनबाई पवार.(छाया : सचिन बैरागी)
बुधवार (दि.20) सकाळच्या सत्रात मतदारांचा सौम्य प्रतिसाद दिसून आला. दुपारी मात्र मतदान केंद्राच्या बाहेर रांगा दिसून आल्या. सायंकाळी पाचपर्यंत 59.93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1,05,390 पुरुष, तर 1,00,201 अशा एकूण 2,05,592 मतदारांनी आपला हक्क बजावला.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. शेवटच्या तासाभरात मतदान करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळत होती. नांदगाव शहरातील अनेक केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. नांदगाव मतदारसंघातील एकूण 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच नांदगावमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने नांदगावमध्ये दिवसभर तळ ठोकून होते. नांदगावला दुपारी सुहास कांदे-समीर भुजबळ यांच्यात आमनेसामने वाद झाल्यानंतर गावात काहीसे तणावाचे वातावरण झाले होते. परंतु पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यामुळे नंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारनंतर मतादानाचा वेग वाढला आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
नांदगाव : सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या महिला मतदार.(छाया : सचिन बैरागी)
मतदारसंघातील मजूरवर्ग ऊसतोडीसाठी बाहेर गेलेला आहे. परंतु आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ऊसतोड कामगार मजुरांनीदेखील आपापल्या गावात हजर होत आपला मतदानाचा हक्क बजावला.